======================
पांढरकवडा (यवतमाळ), दि. ८ : वादळी पावसाचे सावट असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचा सावरकर विरोधकांनी धडा घ्यावा. अन्यथा सावरकरांवर प्रेम असणारे मतदार असे वादळ निर्माण करतील ज्यात विरोधकांची दाणादाण उडेल, अशी गर्जना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदियाचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आयोजित सावरकर गौरव यात्रेतील सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. अशोक ऊईके, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, चंद्रपूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, यवतमाळ जिल्हा भाजपा अध्यक्ष नितीन भुतडा, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, शिवसेना संपर्क प्रमुख हरीहर लिंगनवार, तालुकाध्यक्ष आनंद वैद्य, भाजयुमोचे आकाश धुरट, यवतमाळचे महामंत्री रवी बेलोरकर, राजू पडगीलवार, चंद्रपूरचे महामंत्री नामदेव डाहुले उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान इंग्रजांची सेवा घेणाऱ्या ईटलीच्या घराण्यापेक्षा कित्येकपट मोठे आहे. त्यामुळे सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशा भ्रष्ट लोकांची डोकी ठिकाणावर आणण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. सावरकरांवर विनाकारण टीका करणाऱ्यांचा मेंदू आणि बुद्धी ठिक व्हावी अशी जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. केवळ दाढी वाढविल्याने कुणालाही पंतप्रधान होता येत नाही, असा टिप्पणी करताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, त्यासाठी तपस्या ,त्याग आणि बलिदान गरजेचे आहे. मेंदूचा विकास झालेला असावा लागतो. राष्ट्रभक्तीची भावना जागरूक ठेवावी लागते.
=================
ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सावरकरांच्या अवमानानंतर निर्माण झालेले वादळ राष्ट्रभक्ती, राष्ट्र चेतनेचे वादळ आहे. हे वादळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धुळ चारल्याशिवाय राहणार नाही. ‘सावरकर का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ असा निर्वाणीचा ईशाराच आपल्या भाषणातून ना. श्री. मुनगंटीवार यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला दिला. त्याग, तपस्या आणि बलिदान हीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वास्तविक ओळख आहे. त्यांची बरोबरी राहुल गांधी कधीच करू शकत नाहीत. राहुल गांधी नेहमी म्हणतात की ते सावरकर नाहीत. ही बाब अगदी सत्य आहे. अनेक जन्म घेतले तरी राहुल गांधी सावरकर होऊच शकत नाही. ईतकेच काय तर ते गांधी देखील नाही. परदेशात शिक्षणासाठी जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी राहुल विंची असे नामांतर केले होते. जी व्यक्ती आपल्या नावाशी एकनिष्ठ राहु शकत नाही. त्याला राष्ट्रभक्ती काय कळणार असा कणखर सवालही ना. श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा ही केवळ लोकांची गर्दी नाही. ही एकजूट त्या राष्ट्रभक्त लोकांची आहे. ज्यांच्या मनात स्वातंत्र्य सैनिकांविषयी आदर आहे. इंग्रजांनी जितका त्रास स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिला. तितकाच शाब्दीक त्रास ब्रिटनमधुन शिकुन आलेले राहुल गांधी देत असतील तर इंग्रजांप्रमाणे आता राहुल गांधी यांनाही धडा शिकविण्याची वेळ आलीय, असे कळकळीचे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी उपस्थिताना केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नावच नाही तर ते अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे प्रेरणास्थान आहे. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेल्यांचे ते ऊर्जास्थान आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार ठामपणे म्हणाले.
चाफेकर बंधुंना फाशी देण्यात आली त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर अस्वस्थ झाले. त्यांचा जीव कासावीस झाला. त्यावेळी कमी वयातच सावरकरांनी कुलदेवतेसमोर शपथ घेतली की आपले आयुष्य ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित करतील. हे सावरकर राहुल गांधी यांना कधी कळुच शकत नाहीत, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. महात्मा गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती केली आहे. त्याच गांधींचा वारसा सांगणारे राहुल गांधी सावरकरांचा अवमान करीत असतील तर त्यांना योग्य जागा दाखविलीच पाहिजे, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात. परंतु सावरकर जगातले एकमेव असे स्वातंत्र्यवीर आहेत ज्यांना मातृभूमीसाठी लढताना दोन जन्मठेपेंची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेमध्ये अमानुष अत्याचार सावरकरांवर करण्यात आलेत. हे अन्याय आजच्या युगातील कोणताही नेता सहन करू शकत नाही. हा अन्याय सहन करूनही स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी लढा दिला, हे राहुल गांधी यांना दिसत नाही. महात्मा गांधी यांच्या दिमतीला इंग्रजांनी सेवक ठेवले होते. गांधी, नेहरू घराण्यातील लोक जेव्हा तुरुंगात जायचे त्यावेळी त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवल्या जायच्या. महात्मा गांधी यांच्या पत्रात तसा स्पष्ट उल्लेखही आहे, हे राहुल गांधी यांना कधी दिसले नाही का, असा परखड सवालही ना. श्री. मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांना सभेतून विचारला.
* ब्रिटिश आले, काँग्रेस सोडून गेले *
=========================
ब्रिटिश भारतात आले त्यावेळी त्यांनी अनेक वाईट गोष्टी भारतात सोडून देण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक म्हणजे काँग्रेस. काँग्रेसची स्थापना एका इंग्रजाने केलीय. त्यामुळे ब्रिटिश आले आणि जाताना काँग्रेस सोडून गेले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, असा उपहास ना. श्री. सुधीर मुनगंटीवार केला.
====================
* अपमानाची मालिकाच *
=====================
काँग्रेसने थोर राष्ट्रपुरुषांच्या अपमानाची मालिकाच चालवलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर पासून नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज आणि अगदी अलीकडचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अवमान करीत काँग्रेसने आपली लायकी काय आहे, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकांनी अशा काँग्रेसपासून सावध व्हावे, जे राष्ट्रभक्तांचा अपमान करतात असे कळकळीचे आवाहनही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.
* भारत जोडो म्हणजे प्रायश्चित्त *
=====================
काँग्रेस आणि गांधी यांनी भारत तोडण्याचे, फोडण्याचे काम केले. भारताची फाळणीही यांच्यामुळे झाली. आधी भारत तोडो करणाऱ्या काँग्रेसचे पाप कळल्यामुळे राहुल गांधी यांनी प्रायश्चित्त म्हणून भारत जोडो यात्रा केली. भारत कधीही न पाहिलेले राहुल गांधी यांना यामुळे भारत काय आहे, ते निदान कळले तरी असेल, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.