=========================
राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे मागणी,
========================
अनुसूचित जाती प्रवर्गातील अनेक बांधवाचे नाव पंतप्रधान घरकुल आवास योजनेत आले आहे. मात्र या योजनेत घरपट्याची अट असल्याने त्यांना योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता या सर्व लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेत समाविष्ट करुन त्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे कार्यवाहक अध्यक्ष अरुण हालदार यांना केली आहे.
======================
आज मुंबई येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची आढावा बैठक पार पडली या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्या डॉ अन्जू बाला, सदस्य सुभाष रामनाथ पारधी, संचालक कौशिक कुमार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यासह राज्यभरातील अनुसूचित जाती राखीव मतदार संघातून निवडून आलेल्या खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती.
अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये रमाई आवास योजना अस्तित्वात आहे. परंतु चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात काही अनुसूचित जाती बांधवाना पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. मात्र पंतप्रधान घरकुल आवास योजनेत लाभार्थ्यांजवळ स्वमालकीच्या पट्ट्याची जागा असणे आवश्यक आहे. परंतु चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मागील ४ दशकापासून बहुतांश नागरीक हे महसूल व वेकोलि च्या जागेवर कच्चे घर बांधून राहत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे घरपट्टे नाही परिणामी पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असले तरी त्यांना सदर योजेनाचा लाभ घेण्यास अडचण येत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत नाव असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्ग बांधवाना रमाई आवास योजनेत समाविष्ट करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली आहे. सदर मागणीचे निवेदनही त्यांच्या वतीने देण्यात आले आहे. सोबतच सदर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळविण्यातही अडचणी येत आहे. याकडेही आयोगाने लक्ष देण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793