======≠========================
*पिक विमा योजनेची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा!* ================================
*शेतकऱ्यांचे विषय संवेदनशीलपणे व गांभीर्याने हाताळा* ===============================
*पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल* ===============================
चंद्रपूर, दि. १९- : *जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा कदापी दुःखात असू नये, अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वोपरि सहकार्य केले पाहिजे, शासनाकडून त्यांच्यासाठी कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून संवेदनशीलपणे प्रयत्न व्हावे, कुठलीही कुचराई खपवून घेणार नाही; हा विषय गांभीर्याने हाताळला जावा अश्या कडक शब्दात पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकाऱ्यांना सुनावले.*
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात पिक विमा योजनेतील प्रलंबित रकमेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन, कृषी अधीक्षक श्री. शंकर तोटावार, शेतकरी नेते श्री बंडू गौरकर, यांच्यासह विमा कंपनीचे अधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे मागील महिन्यात मोठा दिलासा मिळाला. राज्याचे कृषिमंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांच्या सतत संपर्कात राहून, मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. चंद्रपूर जिल्ह्याचे काम ओरिएंटल पिक विमा कंपनीकडे असून सदर कंपनीने २०२.६७ कोटी रुपये पिक विमा योजनेची रक्कम मान्य केली आणि ना. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर १४३.८१ कोटी रुपये वितरित करण्यात आले. परंतु अद्यापही ५८.९४ कोटी रक्कम थकीत असून यासंदर्भात गुरुवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
विमा कंपनीने राज्य सरकारकडे मागणी करून देखील अद्याप ही रक्कम प्राप्त न झाल्याने पालकमंत्री मुनगंटीवार यांनी कृषी विभागातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.
चंद्रपूर जिल्ह्यात १ लक्ष ५१,३५२ शेतकऱ्यांनी पीक विमा दावा दाखल केला होता, यापैकी १ लक्ष १८,५८८ शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम प्राप्त झाली, ३२ हजार ७६४ शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम अप्राप्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रक्कम अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिले.
विहित मुदतीत अपात्र न केलेले अर्जही पात्र करण्याबाबतचे आदेश ना. मुनगंटीवार यांच्या विनंतीवरून कृषी मंत्र्यांनी मागील बैठकीत दिले होते, हे विशेष.
*कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा !*
पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अतिशय संवेदनशील पणे दखल घेणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना दूरध्वनी करून वस्तुस्थिती अवगत करून दिली. पिक विमा योजने संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची आपण पूर्ती करू आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ यासाठी आपल्या स्तरावरून आदेश द्या अशी विनंतीदेखील ना मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
ना सुधीर मुनगंटीवार यांची प्रशासनावरील पकड व संवेदनशील कार्यपद्धती ही सर्व परिचितच आहे; परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सुधीरभाऊ तातडीने धावून येतात अशी प्रतिक्रिया देत, उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,