=================================
चंद्रपूर,दि.२३ – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने दोनदा पराभव केला. त्यांना १९५२ मधील निवडणुकीत हा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला काँग्रेसने संविधानाला मान्य नसलेला प्रकार केला. भंडारा येथील निवडणुकीत काँग्रेसने नॉन मॅट्रिक उमेदवार दिला आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा काँग्रेसमुळे पराभव स्वीकारावा लागला. हे पाप काँग्रेसच्या नेत्यांनी केले. त्यामुळे, माझा एल्गार हा काँग्रेसच्या जनहित विरोधी विचारांच्या विरोधात, काँग्रेसच्या नौटंकीच्या विरोधात आहे, असा निर्धार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बल्लारपूर येथे अनुसूचित जाती मोर्चा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहून गांधींवर हल्लाबोल केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते, ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,गौतम निमगडे, छगन जुलमे, श्वेता वनकर, आकाशी गेडाम, केमा रायपुरे, सारिका कनकम, कांता ढोके, पूनम मोडक, महेंद्र ढोके, सतीश कनकम आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘देशातील दोन पंतप्रधानांनी स्वतःच्याच मंत्रीमंडळात स्वतःला भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला. परंतु, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिले नाही. १९८९ मध्ये भाजपा व जनता दलाच्या सरकारने बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भारतरत्न ही पदवी एव्हरेस्टपेक्षा मोठी झाल्याचे ते म्हणाले.’
‘या वर्षाचे एक महत्त्व आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान समर्पित करण्याच्या घटनेला या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यामध्ये आपण देखील संकल्प करून वाटा उचलायला हवा. हा संकल्प म्हणजे संविधानात असलेल्या तरतुदींच्या अंमलबजावणीचा होय. हा संकल्प देशातील शोषित, वंचितांच्या कल्याणाचा आहे. देशातील जबाबदार नागरिक निश्चितच यामध्ये पुढाकार घेतील. हा संविधानाच्या सन्मानाचा संकल्प आहे. संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी तुम्हाला-आम्हाला घ्यायची आहे,’ असेही आवाहन ना.मुनगंटीवार यांनी केले.
काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात होते. परंतु, केवळ तीनशे घरे रमाई आवास योजनेतून तुम्ही देऊ शकले. भाजपने एका वर्षी साडेसात हजार घरे दिली. आता घरांची संख्या जास्त असून लाभार्थ्यांची संख्या कमी आहे. आम्ही योजना राबविताना सर्व समाजाचा विचार केला, असेही मुनगंटीवार म्हणाले. भाजपने नेहमीच अनुसूचित जातींचा विचार केला. परंतु, भाजप विरोधात नरेटिव्ह सेट केले जातात. दुर्दैवाने भाजपचे कार्यकर्ते त्याला उत्तर देताना कमी पडतात. भाजप कधीही जातीवर बोलत नाही. माझ्या कार्यालयात मी कधीच जात-पात-धर्म पाहून काम करीत नाही. मी हजारो लोकांचे ऑपरेशन केले पण जात पहिली नाही. मानवतेचा धर्म मोठा आहे. वंचित आणि शोषितांच्या मदतीला धावून जाण्यासारखे मोठे पुण्य नाही, असे महामानव बाबासाहेब सांगतात. म्हणून मी कधीही जात विचारली नाही, असे ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
संविधानाच्या नावाने काँग्रेसची कोल्हेकुई
‘त्या’ विधानावर पॉलिश
खोटे बोलणारे नेहमी उघडे पडतात. खोट बोलता बोलता कधी कधी सहज खरे निघून जाते. अमेरिकेमध्ये राहुल गांधींच्या तोंडून खरे निघून गेले, असे बोलत ना.सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अमेरिकेमध्ये भाषण देताना राहुल गांधी यांनी ‘हम आरक्षण मिटा देंगे’ असे म्हटले. काँग्रेसचे चमचे त्याच्यावर पॉलिश करून सांगतात की ‘त्याचा अर्थ तसा नव्हता’. ५५ वर्षे तुम्ही सरकारमध्ये असताना अनुसूचित जातींसाठी काम का केले नाही? असा प्रश्न देखील सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला केला. काँग्रेसची हीच खरी भूमिका असल्याचेही ते म्हणाले. =================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,