ना.मुनगंटीवार यांनी मानले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार
चंद्रपूर, दि. 4 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) 50 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासदंर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे शासन निर्णयाची प्रत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे स्वतः सुपूर्द केली. एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
मौजा विसापूर, ता. बल्लारपूर येथील सर्वे क्रमांक 466 मधील महापारेषण कंपनीच्या ताब्यातील भुसंपादीत जमिनीपैकी 50 एकर भुसंपादीत जमीन एस.एन.डी.टी. विद्यापीठाला प्रदान करण्यात आली आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जमीन उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 50 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल मुलींची शाळा, बल्लारपूर येथे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लोकार्पण 10 जून 2023 रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. 107 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 1916 मध्ये एस.एन.डी.टी. विद्यापीठाची स्थापना झाली. महर्षी कर्वे यांनी घरोघरी जाऊन दरमहा एक रुपया गोळा करून विद्यापीठाला सक्षम केले. पहिले कॅम्पस पुणे येथे सुरू झाले. त्यानंतर मुंबई, श्रीवर्धन व चंद्रपूरमध्ये ज्ञानसंकुल सुरू करण्यात आले आहे.
या विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळण्यासाठी तसेच महिलांचे ख-या अर्थाने सक्षमीकरण करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार आग्रही होते. 64 प्रकारचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येत असून विद्यापीठाच्या निर्मितीसाठी कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी तसेच त्यांच्या टीमने सातत्याने चंद्रपूरमध्ये भेटी दिल्या.
बल्लारपूर-विसापूर मार्गावर 50 एकर जागेमध्ये 560 कोटी रुपये खर्च करून, राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांना गौरव वाटेल, असे अप्रतिम विद्यापीठ तयार करण्यात येत आहे. ज्यांनी महिलांचा सन्मान वाढविला त्या सर्वांच्या ज्ञानाचा दीपस्तंभ प्रतिकाच्या रूपामध्ये त्या संकुलात लावण्यात येणार आहे. तसेच थोर महिलांची मार्गदर्शक मूल्ये पुतळ्यासह लावण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. महिलांच्या पारंपारिक खेळांसाठी वातानुकुलीत इनडोअर स्टेडियम येथे उभारण्यात येईल.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्याकडून महसूलमंत्री यांचे आभार
चंद्रपूर येथे प्रस्तावित एसएनडीटी विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुल परिसरासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः आज या शासन निर्णयाची प्रत ना.मुनगंटीवार यांना विधिमंडळातील कार्यालयात वितरित केली. या गतीमान निर्णयासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.