कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
71

=======================

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी रानभाज्याचे विशेष महत्व
===================
जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

========================
चंद्रपूर, दि.16:  देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असून या वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये नागरिकांचे पोट भरण्याची क्षमता कोणत्याही उद्योगात नसून फक्त कृषी, मत्स्यसंवर्धन व वने या तीन क्षेत्रातच आहे. मत्स्यसंवर्धनात जिल्हा मॉडेल करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. मत्स्यव्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मिशन जयकिसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी. कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा, यादृष्टीने गतीने कार्य केल्या जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर  मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
===========================
कृषी भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड,  राहुल पावडे, अंजली घोटेकर, राखी कंचर्लावार,डॉ.मंगेश गुलवाडे, नामदेव डाहूले, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बांधव तसेच महिला बचत गटाच्या महिला आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
======================
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक पोषणमूल्ये रानभाजीतून मिळत असते. बदलत्या आहाराचा प्रमुख पर्याय म्हणून रानभाज्यांकडे बघण्याची नितांत आवश्यकता आहे.  दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा तसेच नव्या पिढीला रानभाज्याची ओळख व्हावी, रानभाज्यांचे आहारातील महत्व पटवून देण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खाद्यपदार्थांच्या परंपरा आहेत. मात्र, हळूहळू पिझ्झा, बर्गर व इतर गोष्टींमुळे ह्या पंरपरा लुप्त व्हायला लागल्या आहेत. एकेकाळी आरोग्य संवर्धनाचे काम आजीच्या बटव्यातील भाजीतून व्हायचे. नवीन पिढीला रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्व व त्यांचे गुणधर्म माहिती नसल्याने जे खाद्य आरोग्यास अपायकारक असून देखील त्यांच्या मोहात पडली असल्याचे ते म्हणाले.
=======================
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर देशात विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेती यामध्ये वेगाने काम होत आहे. जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी मदर डेअरीसोबत बैठक घेण्यात येत आहे.  शेतकरी आणि शेती सुखी आणि संपन्न करावयाची असल्यास विकेल तेच पिकवावे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम उपयोग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यात सोमनाथ येथे अप्रतिम असे कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येत असून अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान देणारे प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे.
========================
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे  म्हणाले, मिलेट्सचे (तृणधान्याचे) महत्त्व विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी जगाला पटवून दिले. या वर्षात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा केल्या जात आहे. याचा खरा पायोनियर हा भारत देश आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देते तर राज्यातील साधारणतः 1 कोटी 10 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचे 6 हजार रुपये येतात. आता राज्यानेही 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय 1 रुपयात पिक विमा देण्यात येत असून एक रुपयात पिक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमात्र राज्य असल्याचेही ते म्हणाले.
=====================
शहराची लोकसंख्या ही मोठी आहे. मात्र, या महोत्सवासाठी येणाऱ्यांची संख्या कमी आहे. बदलत्या स्वरूपात रानभाजी महोत्सवाची माहिती, व्हिडिओ किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना केल्या. शरीर आणि मनाचे उत्तम आरोग्य घडविणारा पदार्थ म्हणजे रानभाजी. त्यादृष्टीने, कृषी अधिकाऱ्यांनी या रानभाज्यांच्या प्रचारासाठी उत्तम नियोजन करावे. रानभाजीपासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. जेणेकरून, बचत गटातील महिलांना व गृहिणींना चविष्ट भाज्या कशा करता येईल ? तसेच रानभाज्यांचा उपयोग कशा पद्धतीने करावा याची माहिती मिळेल. यासाठी नागपूरमधील प्रसिद्ध आहारतज्ञ, मास्टरशेफ यांना रानभाजी महोत्सवात निमंत्रित करावे.
====================
मिशन जयकिसानच्या माध्यमातून जिल्हा शेतीच्या क्षेत्रात वेगाने पुढे जाण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी कल्पकतेच्या जोरावर मिशन जयकिसानच्या माध्यमातून महिला बचत गटामार्फत उत्पादित वस्तू व विक्री करण्यासाठी विक्री केंद्र, भाजीपाला विक्रीकरीता वातानुकूलित वाहने, कीडरोगावर सल्ला तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी सभागृह करण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी रानभाज्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली व कृषी विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
======================
प्रास्ताविकेत बोलतांना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले,  शासनाने 9 ऑगस्टपासून रानभाजी महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने, या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनात आरोग्य हा महत्त्वाचा विषय आहे. आरोग्य  सुदृढ राखण्यासाठी आहारात रानभाज्यांचे महत्त्व आहे. शहरी भागातील नागरिकांना या रानभाज्यांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या आहारात या रानभाज्यांचा समावेश व्हावा व महत्त्व वाढावे यानिमित्ताने 9 ते 15 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
=======================
पालकमंत्र्यांच्या हस्ते रानभाजी माहिती पुस्तिकेचे विमोचन:
रानात आढळणाऱ्या भाज्या पौष्टिक असून त्यांचे औषधी गुणधर्म आहे. अशा भाज्यांची माहिती व ती बनविण्याची पद्धती पुस्तिकेत संकलित करण्यात आली असून या पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
========================
पीकस्पर्धा विजेते शेतकरी व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतील उद्योजकांचा सत्कार:
खरीप हंगाम 2022-23 भात पीक स्पर्धेत हेमंत शेंदरे, किशोर हटवादे व किशोर बारेकर या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यासोबतच, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतील दयानंद तावाडे (राजुरा), बेबीताई सलाम (कोरपना) व शुभांगी मिलमिले (आम्बोरा) यांना सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच, जिल्हा कृषी महोत्सव आयोजनाकरीता उत्कृष्ट सूचना दिल्याबाबत सय्यद आबिद अली, महेश कोलावार व किशोर उपरे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
======================
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण:
सोनी लक्ष्मण कुंभरे (चंद्रपूर), बंडू काशिनाथ पिपरे (बल्लारपूर) व मनोहर पांडुरंग खिरटकर (वरोरा) अपघातग्रस्तांच्या वारसदारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते 2 लक्ष रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले.
=======================
विविध स्टॉलला भेट व पाहणी:
रानभाजी महोत्सवाच्या निमित्याने महिला बचत गटामार्फत विविध प्रकारच्या विक्रीस ठेवण्यात आलेल्या रानभाज्या तसेच पौष्टीक तृणधान्यापासून बनविण्यात आलेले पदार्थाचे स्टॉल कृषी भवन परीसरात लावण्यात आले होते. या स्टॉलला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देत पाहणी केली.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here