स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही चुंभली गाव मुख्य रस्त्याविना
गोंदिया जिल्ह्याच्या टोकावरील देवरी तालुक्यातील चुंभली हे ६५ घरे आणि ३५९ च्या वर लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे तर दुसरीकडे, चुंभली ग्रामस्थ अद्यापही पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत, किंबहुना त्यांना या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अद्यापही या गावात मुख्य रस्ता नाही, नदीवर पूल नाही. याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी चार किलोमीटर चिखलातून पायपीट करत या गावात हजेरी लावली व परिस्थितीचा आढावा घेतला.
चुंभली ग्रामस्थांच्या यातनेची जाणीव प्रशासनाला व्हावी म्हणून… –
चुंभलीवासीयांना अजूनही हक्काचा रस्ता नाही. नदीवर पूल नाही, बोटीने नदीतून धोकादायक प्रवास करावा लागतो. देवरीचे आमदार सहसराम कोरटे यांनी चुंभलीवासीयांना २०२० मध्ये एक बोट भेट दिली होती. मात्र, ती आज मोडकळीस आली आहे. चुंभली ग्रामस्थांच्या यातनेची जाणीव प्रशासनाला व्हावी म्हणून आमदार कोरटे यांनी जिल्हाधिकारी गुंडे आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना चिखलातून गावात आणले. प्रशासनाने चुंभलीवासीयांच्या यातनेचा या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घेतला.
लवकरच एक पूल तसेच पक्का रस्ता बांधून देणार –
यापूर्वी निवडून आलेल्या आमदारांनी चुंभलीतील गावकऱ्यांना निवडणुकीपुरती पोकळ आश्वासने दिलीत. मात्र, कुणीही रस्ता तसेच पूल बांधायला पुढाकार घेतला नाही. आमदार कोरेटे यांनी स्वत: पुढाकार घेत थेट जिल्हा प्रशासनालाच या गावात आणत वस्तुस्थिती दाखवून दिली. जिल्हाधिकारी गुंडे आणि पोलीस अधीक्षक पानसरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. लवकरच या ठिकाणी एक पूल तसेच पक्का रस्ता बांधून देऊ, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.
गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण –
गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल स्वत: जिल्हाधिकऱ्यांनी घेतली. यामुळे चुंभली गावातील तुलशीदास खोब्रागडे, कैलास पंधरे, मुलचंद उपाध्ये यांच्यासह इतर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी चुंभली गावात आल्याने गावकरी आनंदी आहेत. येत्या काही दिवसात नदीच्या पात्रावर एक पूल बांधू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793