=======================
चंद्रपूर-गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विणले गेलेले तंबाखू तस्करांचे जाळे लवकरच उध्वस्त करू व तस्करांवर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.सामाजिक समता संघर्ष समितीचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचेशी भेट घेऊन चर्चा केली असता सदर आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांना सामाजिक समता संघर्ष समिती चे अध्यक्ष इरफान शेख यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेटून शहर व जिल्ह्यातील तंबाखू तस्करांच्या नावासह त्यांच्या अवैध कारखाण्याबद्दल अवगत केले.
जिल्ह्यात काही मोठे तस्कर असून त्यांचा बनावट तंबाखू बनविण्याचा कारखाना असून पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने तो उध्वस्त केला.या तिघांवर विविध कलमान्वये कारवाई केली मात्र ते बाहेर येताच त्यांच्या कारवाया पुन्हा वाढत आहेत. या तस्करांच्या माध्यमातून पान टपरीवर हा तंबाखू सहज पोहचत असल्याने बनावट तंबाखू मिश्रित खर्रा तयार होत असून हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात कर्करोग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.बालक व तरुण या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत.
तंबाखू तस्कर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला माहीत आहेत.पोलीस वारंवार कारवाई करतात. काही दिवस कोठडीत राहिल्यानंतर ते पुन्हा बाहेर येतात व आपले कारनामे पुन्हा जोमाने सुरू करतात. ते कोठडीत असले की त्यांचे नेटवर्क आणखी जोमाने कामात असते. तस्करीच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हवाला व इतर प्रकारात वापरला जातो. त्यातून संघटित गुन्हेगारी वाढत आहे.हा प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असून यावर आळा घालण्यासाठी आता कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
या संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आता तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणे, अमली पदार्थ कायद्याच्या कलमाखाली त्यांचेवर गुन्हे दाखल करणे आणि त्यांना जिल्ह्यातून तडीपार करणे अत्यावश्यक झाले आहे.
या तस्करांवर कायमस्वरूपी कारवाई झाली नाही तर ते पुन्हा तस्करीच्या माध्यमातून तंबाखूच्या विळख्यात पिढी बरबाद होईल. या गंभीर प्रकारची आपण गांभीर्याने दखल घेऊन तस्करांच्या टोळीचा बंदोबस्त करावा व जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची हमी व सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली.शिष्टमंडळात सामाजिक समता संघर्ष समितीचे हर्षद कानमपल्लीवार, कादर शेख,विजय दुर्गे आदींचा समावेश होता.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793