==========================
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा
============================
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला काँग्रेसचा खरपूस समाचार
============================
घुग्गुस येथील जाहीर सभेला उसळली रेकॉर्डब्रेक गर्दी
=============================
चंद्रपूर, दि. १६ एप्रिल २०२४ : “काँग्रेस हे जळते घर आहे, असे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे कार्य काँग्रेसला कधीच जमले नाही. काँग्रेसने कायम बाबासाहेबांचा अपमान केला. एवढेच नव्हे तर काँग्रेसने दोनवेळा त्यांचा पराभवही केला. त्यामुळे बाबासाहेबांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसचा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत पराभव करा आणि त्यांना धडा शिकवा”, असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
============================
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ घुग्गुस येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी जाहीर सभेला माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, विवेक बोढे, विनोद चौधरी, निरीक्षण तांडरा, साजन गोहणे, हसन शेख, इर्शाद कुरेशी, चिंतानल बोगा, श्रीनिवास बोचकुला, रवी डिकोंडा, अनिल मंत्रीवार, संतोष नुने, श्रीनिवास रामटेके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
============================
या जाहीर सभेला संबोधित करताना ना. मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षाचा खरपूस समाचार घेतला. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने १९५२ सालच्या लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईत आणि १९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. काँग्रेसमध्ये अनेक बॅरिस्टर्स होते पण डॉ. आंबेडकरांचा अभ्यास आणि विद्वत्ता बघता कदाचित ते राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे होईल, अशी भावना काँग्रेसची होती. जर बाबासाहेबांचे वजन वाढले तर कदाचित काँग्रेसला दलित बांधवांनाही सत्तेत समाविष्ट करून घ्यावे लागेल, या कारणाने काँग्रेसने आंबेडकरांना बिनविरोध निवडून आणले नाही, त्यांचाच पराभव केला. जो काँग्रेस पक्ष आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करतो, वारंवार अपमान करतो, त्या काँग्रेसला तुम्ही मतदान कसे करू शकता? असा प्रश्न त्यांनी घुग्गुस येथील जनतेला विचारला. येत्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत १९ तारखेला भाजप महायुतीला मतदान करून बाबासाहेबांच्या अपमानाचा सूड घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
==============================
काँग्रेसने आजवर प्रत्येक निवडणुकीत दलित समाजाचा वापर करून त्यांना फेकून देण्याचा, दलितांना सतत फसवण्याचा आणि आंबेडकरी चळवळीचा तेजोभंग करण्याचाच गोरखधंदा सातत्याने केला, हे कसे विसरता येईल? काँग्रेसने दलितांबरोबर बेईमानी, दगाबाजी करताना सरंजामी-सामंती कुटुंबशाहीचे नात्यागोत्याचे राजकारण करून दलितांना सत्तेत सहभागी करून न घेता त्यांच्यावर वरपासून खालपर्यंत राज्य केले. काँग्रेसचे हे पाप दलित समाज कधीही विसरणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
=============================
ना. मुनगंटीवार यांचे विचार ऐकण्यासाठी घुग्गुस परिसरातील कार्यकर्त्यांनी जाहीर सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. यावेळी दोनशे मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून ना. मुनगंटीवार यांनी स्वागत करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,