Home चंद्रपूर संगीता राजेंद्र खांडेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर,..! उपमहापौरपदी प्रशांत आनंदराव दानव यांची निवड.
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली 10 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली.
या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांची महापौरपदी तर अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली.
महापौर पदासाठी एकूण १० नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मनस्वी संदीप गिऱ्हे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून संगीता मंगल भोयर, संगीता गोपालकृष्ण अमृतकर, सुनंदा दिलीप धोबे व वैशाली अजय महाडोळे, तर भारतीय जनता पक्षाकडून संगीता राजेंद्र खांडेकर व सारिका सचिन संदुरकर यांनी अर्ज सादर केले होते. अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या कालावधीत मनस्वी संदीप गिऱ्हे, संगीता मंगल भोयर, संगीता गोपालकृष्ण अमृतकर, सुनंदा दिलीप धोबे व सारिका सचिन संदुरकर यांनी आपले अर्ज मागे घेतले.
त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वैशाली अजय महाडोळे व भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांच्यात थेट लढत झाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले असता वैशाली महाडोळे यांना ३१ तर संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाल्याने एका मताच्या फरकाने संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली.
उपमहापौर पदासाठी अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून प्रदीप शंकर देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी, तसेच भारतीय जनता पक्षाकडून संजय नारायण कंचर्लावार यांनी अर्ज दाखल केले होते.
यापैकी संजय नारायण कंचर्लावार, वसंत राजेश्वर देशमुख व राहुल गेंदलाल चौधरी यांनी ठराविक कालावधीत आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे प्रशांत आनंदराव दानव व प्रदीप शंकर देशमुख यांच्यात लढत झाली. मतदानात दोघांनाही प्रत्येकी ३२ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या एकमेव सदस्याने केवळ उपमहापौर पदासाठी मतदान केले असून महापौर पदासाठी तटस्थ भूमिका घेतली. वंचित बहुजन आघाडीचे दोन सदस्य निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित असल्याने ६६ पैकी ६४ सदस्यांनी निवडणुक प्रक्रियेत भाग घेतला.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कामकाज पाहिले. यावेळी महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,शहर अभियंता रवींद्र हजारे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी तसेच मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*