HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) – जीवनात काही महत्त्वपूर्ण गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे. आपले लक्ष नेहमी आपल्या ध्येयाकडे असले पाहिजे, तेव्हा आपले ध्येय सदैव उच्च ठेवा. त्यासाठी प्रचंड मेहनत, परिश्रम करा. जर तुम्ही निश्चित उद्दिष्ट ठरवले, तर यश तुमच्या दारात असेल असा मोलाचा सल्ला गोंडवाना विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी येथे बोलताना विद्यार्थ्यांना दिला.
येथील सरदार पटेल महाविद्यालयातील स्व. राजेश्वरराव पोटदुखे खुले नाट्यगृहात सहाव्या पदवी वितरण समारंभ व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर हे होते, तर यावेळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्याम धोपटे, संघटनेचे सचिव अजय वैरागडे, सर्वोदय शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी उत्तम गेडाम, १९७० च्या बॅचचे विद्यार्थी अरोरा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की डॉ. कावळे म्हणाले की, पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जीवनात काही बाबी कटाक्षाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. “मातृदेवो भव”, “पितृदेवो भव”, “आचार्य देवोभव”, “अतिथी देवोभव” आणि शेवटी “राष्ट्र देवोभव” म्हणजे या राष्ट्राला आपण कधीही विसरू नका, कुठेही गेलो, कोणत्याही पदावर गेलो, देश – विदेशात काम केले, तरी भारत मातेचा सुपुत्र आहे आणि या भारत मातेनेच, माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, माझ्या गुरुजनांनी,अतिथींनी आणि या भारत मातेनेही मला सगळे काही दिल्याचे स्मरण ठेवा असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना सुदर्शन निमकर म्हणाले की, आम्ही शिकलो, खूप मोठा झालो, खूप मोठ्या पदावर गेलो, परंतु आमचे आई-वडील, जर वृद्धाश्रमामध्ये राहत असतील, तर आमच्या शिक्षणाला अर्थ काय असा प्रश्न उपस्थित करीत आई-वडिलांसह गुरुजनांचे स्मरण कायमस्वरूपी मनात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एम.काटकर यांनी करतांना महाविद्यालय हे केवळ संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक देखील अग्रस्थानी असल्याचे सांगत महाविद्यालयाच्या यशाचा लेखाजोखा सांगितला.
‘महाराष्ट्र गीता’ व ‘गोंडवाना विद्यापीठ गीता’ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे पुरस्कारप्राप्त वार्षिकांक ‘शब्दगंधा’ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य श्याम धोपटे यांनी संघटनेच्या वतीने, तर विद्यार्थिनींच्या वतीने सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी कांचन यादव हिने आपले मनोगत व्यक्त केले.
संचालन डॉ. सपना वेगिनवार, डॉ. वैशाली थूल व प्रा. प्रणिता गडकरी यांनी केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

























