HELLO CHANDA NEWS
वरोरा,(वि. प्र.) : शहरातील कर्मवीर वार्डातील एका युवकाने विवाहित महिलेवर चाकूहल्ला केला. आरडाओरड होताच शेजाऱ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले.
ही घटना रंगपंचमीच्या दिवशी बुधवारी (दि. ३) सायंकाळी ४ वाजता घडली. पोलिसांनी युवकाला अटक केली. विकी बावणे असे आरोपीचे नाव आहे. विवाहित महिला भद्रावती पेट्रोल पंपावर काम करत होती. त्या ठिकाणी आरोपी विकी बावणे या युवकाशी ओळख झाली.
काही दिवसांनी तिने पेट्रोल पंपावरील काम सोडले. मात्र, विकी हा तिच्या मोबाइलवर वारंवार फोन करीत असे. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विकीने घर गाठले. दार उघडण्यासाठी जबरदस्ती केली.
दार उघडताच ‘माझा फोन का उचलत नाही, असे विचारत तिच्यावर चाकूने सपासप वार करीत घटनास्थळावरून फरार झाला.
आरडाओरड होताच शेजाऱ्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत महिलेला उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. पती अजय लिहितकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

























