चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथील नवनिर्मित ग्रामीण रूग्णालय त्वरीत लोकार्पित करण्यात यावे व त्यादृष्टीने आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत ८ जुलै रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. टांगले, सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत शाखेचे श्री. महाजन, मुख्याधिकारी न.प. पोंभुर्णा, पोंभुर्णा नगर पंचायत अध्यक्षा सौ. सुलभा पिपरे, माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम, माजी जि.प. सदस्य राहूल संतोषवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सदर ग्रामीण रूग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेतला. अग्नीशमन व्यवस्थेसंदर्भात नगर परिषद मुख्याधिका-यांनी प्रस्ताव तपासून मंजूरी द्यावी, पदभरतीबाबत उपसंचालक आरोग्य सेवा यांनी
कंत्राटी पदांना तातडीने मंजूरी द्यावी, विद्युत ट्रान्सफॉर्मर संदर्भात नगर पंचायतीने ३ लाख ५० हजार रू. किंमतीचे डिमांड शुल्क भरावे व महावितरणने ट्रान्सफॉर्मर बसविण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. सदर ग्रामीण रूग्णालयात नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातुन पाणी पुरवठा नगर पंचायतीने करावा. या ग्रामीण रूग्णालयात हाफकीनच्या माध्यमातुन १ कोटी रू. किंमतीचे साहित्य प्राप्त झाले असून उर्वरित साधनसामुग्रीसाठी जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत निधीची मागणी जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी करावी असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.