मुंबई मंत्रालयात वनमंत्री यांच्यासह बैठक; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष,
चंद्रपूर
हॅलो चांदा न्यूज
चंद्रपूर. (का प्र):- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असून, येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, चंद्रपूर शहरातून थेट ताडोबा सफारीसाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा नसल्यामुळे स्थानिक पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर शहरातून थेट ताडोबा मोहर्ली सफारी गेटपर्यंत क्रुझर सेवा सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर बुधवारी चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुंबई मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वन विभागासंदर्भातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून, चंद्रपूरात वन पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
बैठकीत बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, सध्या सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोहर्ली गेट पर्यंत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून थेट क्रुझर सेवा सुरू झाल्यास स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना मोठी सुविधा मिळेल. शिवाय, यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल.
तसेच, ताडोबा सफारीसाठी शनिवार आणि रविवारसाठी वाढीव शुल्क आकारले जाते, जे सामान्य पर्यटकांसाठी अडचणीचे ठरते. हे वाढीव शुल्क पूर्णपणे रद्द करून आठवड्याभरासाठी समान शुल्क ठेवण्याची मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. बुकिंग करूनही न येणाऱ्या पर्यटकांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या पर्यटकांचे नाव बदलण्याची मुभा देण्यात यावी, तसेच चैत्र नवरात्र आणि श्री माता महाकाली महोत्सवाच्या काळात ताडोबा पर्यटकांसाठी विशेष बससेवा सुरू करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा समृद्ध असून, गोंडकालीन किल्ले त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. याच वारशाचे दर्शन पर्यटकांना घडवण्यासाठी संजय पांडुरंग सब्बनवार यांनी गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती 40×40 फूट लांबीची असून, यात किल्ल्याचे चार प्रवेशद्वार, पाच खिडक्या, संपूर्ण परकोट, बुर्ज आणि मिनारांचा समावेश आहे. हा प्रकल्प ऐतिहासिक जतनासाठी महत्त्वाचा असून, स्थानिक आणि पर्यटकांना गोंडकालीन वास्तुकलेची माहिती देणारा ठरेल. त्यामुळे या प्रतिकृतीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली सफारी गेटजवळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी वनमंत्री यांच्याकडे केली.
दिवंगत ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांच्या बांबू आणि लाकडाच्या शिल्पकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी मोहर्ली सफारी गेट येथे कायमस्वरूपी प्रदर्शनी दालन स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली. मनोहर सप्रे यांनी आपल्या कौशल्यातून बांबू आणि लाकडापासून अप्रतिम शिल्पकृती साकारल्या आहेत. त्यांच्या कलाकृतींचे जतन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी हे दालन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
चंद्रपूरच्या पर्यटनविकासाला गती मिळावी आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. ======================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ======================= *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356