HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : स्केटिंग असोसिएशन ऑफ चंद्रपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत लहानग्या खेळाडूंनी उत्साहात सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत ४ ते ६ वयोगटातील इनलाईन प्रोफेशनल स्केटिंग प्रकारात अधीर जुन्नावार याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले.
अधीरच्या या यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत असून, त्याच्या मेहनतीला, जिद्दीला आणि सातत्यपूर्ण सरावाला यशाचे सुंदर फळ मिळाले आहे.
या यशामागे त्याचे प्रशिक्षक विनोद निखाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे अधीरने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
या स्पर्धेचे आयोजन स्केटिंग असोसिएशन चंद्रपूरचे सचिव प्रवीण चवरे यांनी उत्कृष्ट नियोजनातून केले होते. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी चंद्रपूरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. सचिन भेदे यांच्या हस्ते अधीर जुन्नावार याला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशामुळे अधीर जुन्नावारच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यातही तो जिल्हा व राज्यस्तरावर अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे गाठेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.























