* ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने आयोजित बैठकीनंतर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्‍या डॉक्‍टरांचा संप मागे *

0
45

===≠====≠=≠=======≠=≠=

 * शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील डॉक्‍टरांच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न प्राधान्‍यक्रमाने सोडविणार *

 ==================÷=======

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्‍या अधिनस्‍त असलेल्‍या शासकीय रूग्‍णालयात काही दिवसांपूर्वी एका निवासी वैद्यकिय अधिका-यावर एका रूग्‍णाच्‍या नातेवाईकांनी हमला केला ज्‍यामध्‍ये तो आंतरवासीय डॉक्‍टर जखमी झाला. या आधीही असे प्रकार इथे घडले आहेत. या घटनेचा निषेध म्‍हणून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात काम करणा-या निवासी डॉक्‍टर्स व अंतरवासीय डॉक्‍टर्स गेल्‍या काही दिवसांपासून संपावर होते. या सर्व डॉक्‍टरांशी चर्चा करून हा प्रश्‍न तातडीने सोडविण्‍यासंदर्भात महाराष्‍ट्राचे वन, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले व त्‍यानुसार तातडीने एका बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते.

========================

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अशोक नितनवरे यांच्‍या कक्षात ही बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीला नागपूरहून संपकरी डॉक्‍टरांना भेटण्‍यासाठी आलेले वैद्यकिय शिक्षण विभागाचे संयुक्‍त संचालक श्री. फुलपाटील, जिल्‍हयाचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री. देशपांडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री. मेश्राम, पोलिस उपविभागीय अधिकारी श्री. नंदनवार, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी श्री. रामटेके, भाजपाचे चंद्रपूर जिल्‍हा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, आएमए च्‍या सचिव डॉ. नगीना नायडू, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, डॉ. खामगांवकर, डॉ. जिवने, डॉ. कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. चव्‍हाण, महानगरपालिकेचे अभियंता श्री. हजारे, मार्डचे अध्‍यक्ष डॉ. तेजस्विनी चौधरी, उपाध्‍यक्ष डॉ. रोहित होरे, महासचिव डॉ. प्रशांत मकदूम, डॉ. ऋतुजा गांगर्डे, अस्‍मीचे कोषाध्‍यक्ष डॉ. पुष्‍कर दिक्षीत, डॉ. अनिकेत शेळके व अन्‍य अधिकारी उपस्थित होते

यावेळी आंतरवासीय डॉक्‍टर्स व निवासी डॉक्‍टर्स यांनी अनेक मुद्दयांवर हा संप केला असल्‍याचे सांगीतले. त्‍यात प्रामुख्‍याने सुरक्षेचा मुद्दा त्‍यांनी उपस्थित केला. एकंदर मान्‍य सुरक्षा रक्षकांच्‍या संख्‍येच्‍या अनुपातात दवाखान्‍यासाठी जास्‍त सुरक्षा रक्षक असणे आवश्‍यक असल्‍याचा मुद्दा त्‍यांनी प्रकर्षाने मांडला. दवाखान्‍यातील विविध विभागांमध्‍ये सुरक्षा रक्षकांची आवश्‍यकता असल्‍याचे यावेळी सर्वांनी मान्‍य केले. याकरिता सुरक्षेचे एक ऑडीट होणे आवश्‍यक आहे असे बैठकीत ठरले. त्‍यानुसार डॉ. जिवने यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एका समितीची स्‍थापना करण्‍यात आली. तर डॉक्‍टर चांदेकर, सिटी पोलिस स्‍टेशनचे प्रमुख श्री. अंभोरे, सुरक्षा शाखेचे प्रमुख, डॉ. तेजस्विनी चौधरी, डॉ. रोहित होरे, डॉ. पुष्‍कर दिक्षीत हे समितीचे अन्‍य सदस्‍य राहतील. या समितीने पुढील तिन दिवसात सुरक्षेचे ऑडीट करून आपला अहवाल अधिष्‍ठाता यांच्‍याकडे द्यावा, असे ठरले. त्‍यानंतर अधिष्‍ठाता वाढीव सुरक्षा रक्षकाच्‍या मागणीसाठी आपला प्रस्‍ताव करून विभागाला पाठवतील, असेही बैठकीत ठरले.

======÷÷÷÷=÷÷==========

त्‍यानंतर निवासी व आंतरवासीय डॉक्‍टर्स ज्‍या इमारतीत राहतात तेथील सुरक्षा व राहण्‍याची व्‍यवस्‍था यावरही विस्‍तृत चर्चा झाली. त्‍या इमारतीला जुजबी व राहण्‍यायोग्‍य करण्‍यासाठी प्रस्‍ताव तयार करण्‍याचे ठरले व तसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांना सांगण्‍यात आले. हे काम लवकरात लवकर व्‍हावे असे निर्देश अधिका-यांना देण्‍यात आले. ही इमारत महानगरपालिकेच्‍या अधिनस्‍त असल्‍याने त्‍यांनी सुध्‍दा यात मदत करावी अशी अपेक्षा यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आली. वैद्यकिय अधिका-यांची संख्‍या अतिशय कमी असल्‍याने पदभरतीसाठी विभागाला तातडीने लिहावे व मा. पालकमंत्र्यांना यासंदर्भात विनंती करावी, असेही बैठकीत ठरले. या शिवाय विभागीय अनेक छोटया मागण्‍यांवरही याप्रसंगी विस्‍तृत चर्चा झाली. यावरही सकारात्‍मक तोडगा काढण्‍याचे आश्‍वासन संबंधित अधिका-यांनी दिले. यासर्व आश्‍वासनानंतर उपस्थित अधिका-यांनी डॉक्‍टरांना संप संपविण्‍याचे आवाहन केले. त्‍याला सकारात्‍मक प्रतिसाद देत व मा. पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यावर विश्‍वास ठेवत संप ताबडतोब मागे घेण्‍याचे ठरविले व तशी घोषणा केली. त्‍याबद्दल उपस्थितांनी सर्व डॉक्‍टर्संना धन्‍यवाद देत त्‍यांच्‍या मागण्‍या पूर्ण करण्‍याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री. देशपांडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

÷========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here