============================
चैत्र नवरात्र महाकाली यात्रेच्या तयारीसाठी प्रशासनाला निर्देश, विविध विकासकामांवर चर्चा
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर:(का प्र ):-चैत्र महिना आला की, लाखो भक्तगण श्रद्धेने माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात येतात. या यात्रेची महती संपूर्ण देशात पोहोचावी आणि भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय मातेचे दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनाने प्रभावी व्यवस्था करावी. यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी आणि मागील वर्षांच्या अनुभवावर आधारित उणिवा दूर करून भाविकांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यावर भर द्यावा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चैत्र महिन्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेसह शहरातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, शाखा अभियंता श्रिकांत भट्ट, मनपा उपायुक्त मंगेश खवले, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता बहुरिया, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी रांजनकर यांच्यासह संबधित विभागातील अधिका-यांची उपस्थिती होती.
३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्र महाकाली यात्रेत यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. यात्रा परिसर स्वच्छ व सुंदर राहावा, यासाठी नियमित स्वच्छता मोहिमा राबवाव्यात. पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे आणि त्यांची नियमित देखभाल करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले आहेत.
माता महाकाली यात्रेचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता, या यात्रेची महती देशभर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. डिजिटल माध्यमांतून यात्रा व्यवस्थेची माहिती भाविकांपर्यंत पोहोचवावी. तसेच मार्गदर्शन केंद्र उभारून यात्रेतील सेवा व सुविधा यांची माहिती भाविकांना द्यावी.
यात्रेकरूंच्या सुरळीत हालचालीसाठी वाहतूक व्यवस्थापन काटेकोर असावे. वाहन पार्किंगसाठी पटेल, कोठारी, बागला यांच्या जागेसह इतर जागा निश्चित करून तेथे भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. वाहतूक विभागाने यात्रेकरूंच्या वाहनांना अडवू नये, कोणत्याही गैरसोयीशिवाय ते मंदिर परिसरात पोहोचतील, अशी व्यवस्था करावी. गर्दी नियंत्रणासाठी वळण मार्गांची योग्य रचना करण्यात यावी. अधिकाधिक भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरणात दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी वॉटरप्रूफ पंडाल उभारून यात्रेचा विस्तार वाढवावा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
विकासकामांवर विशेष भर
चंद्रपूरच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या योजनांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पुतळा उभारणी प्रकल्प, शहरातील पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामांना गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठकीत सांगितले.
अनेक विकासकामे प्रलंबित असून ती वेळेत पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे. चंद्रपूरच्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार कामांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. शहरातील ऐतिहासिक आणि महापुरुषांचे पुतळे उभारणीचे काम पूर्ण करणे, तसेच वाहतूक, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार करणे ही तातडीची गरज आहे.
यासोबतच, चंद्रपूर शहरातील रस्ते, वळण मार्ग, सायकल वाटप योजना, नदीकाठावरील विकास प्रकल्प आणि गुंठेवारीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत संबधित अधिकार्यांना दिले आहेत. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, महाकाली मंदिर चे विश्वस्त सुनिल महाकाले, माजी महानगर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, मनोज माल, माजी नगर सेवक देवानंद वाढई, अमोल शेंडे, मंगेश अहिरकर, सलिम शेख, नकुल वासमवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, ======================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,942216806
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356