================================
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून ‘अम्मा संस्कार भारती’ उपक्रमाला सुरुवात
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर, (का प्र ):- आपल्या संस्कृतीचे संवर्धन आणि पुढच्या पिढीला योग्य संस्कार देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आपण उचलले आहे. अम्मा संस्कार भारती हा उपक्रम चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवे व्यासपीठ आहे. अम्मा संस्कार भारती म्हणजे केवळ एक शिक्षणपर उपक्रम नाही, तर मुलांच्या मनोभूमीवर संस्कारांची गोड शिदोरी ठेवण्याचा आमचा एक प्रयत्न असून, यातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचा आमचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘अम्मा संस्कार भारती’ या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी लक्ष्मी नारायण मंदिर येथे मुलांमध्ये भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि शारीरिक-मानसिक विकास घडविण्यावर भर दिला जाणार आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर उपक्रमाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रशिक्षिका अनामिका चहारे, प्रशिक्षक राजु जोशी, प्रशिक्षिका मिनाश्री ठेंगडी, प्रशिक्षिका रुपाली तोषनीवाल, प्रशिक्षक अनिरुद्ध टिकले, श्रद्धा सेलोटे, मृनाल पनके, लक्ष्मी नारायण मंदिरचे विश्वस्त जुगल सोमानी, कैलास सोमानी करणसिंग बैस, आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सध्याच्या तंत्रज्ञान प्रधान युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक अस्थैर्य आणि जीवनशैलीत विस्कळीतपणा दिसून येत आहे. गॅझेटच्या आहारी गेलेल्या मुलांना आपली परंपरा, संस्कारांची ओळख व्हावी, त्यांना जीवनमूल्ये मिळावीत, यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण हा उपक्रमाचा राबवत आहोत. या उपक्रमाला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय संस्कृतीत बालपणी दिलेले संस्कार संपूर्ण जीवनाचा पाया घडवतात. म्हणूनच ‘अम्मा संस्कार भारती’ उपक्रमाच्या माध्यमातून ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी मंत्रजप, श्लोक, स्तोत्र पठण, प्राणायाम, सूर्यनमस्कार, चारित्र्य संवर्धन, पौराणिक कथा, चित्रकला आणि आर्ट अँड क्राफ्ट असे विविध उपक्रम घेतले जात आहे. मुलांच्या मनामध्ये सकारात्मक विचार रुजावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना चांगले आचरण आणि आदर्श विचार मिळावेत, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
आजच्या मुलांमध्ये चांगले विचार आणि सशक्त व्यक्तिमत्त्व निर्माण करणे, हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. म्हणूनच हा उपक्रम केवळ संस्कारांची शिकवण देणारा नसून, आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी चिमुकल्यांसह पालकवर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356