====================================
आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिराचा समारोप
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर. (का प्र) :- गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ व मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत हृदयविकार व श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर २२ व २३ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पार पडले. आज (बुधवार) समारोपीय कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शिबिरात सेवा देणाऱ्या मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटल व जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे, ज्युपिटर रुग्णालयाचे डॉ. परमानंद आंदनकर, डॉ. एल. श्रीनिवास, डॉ. सोनारकर, डॉ. सोनिया कारापूरकर, डॉ. खुशबू मेहता, रेशमा पवार, अजय जयस्वाल, तुषार सोम, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, चंदू वासाडे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, नामदेव डाहुले, राहुल घोटेकर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, वंदना हातगावकर, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, करणसिंह बैस, कार्तिक बुरेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात विशेषतः दुर्बळ व गरजू कुटुंबांतील १८ वर्षांखालील हजारो बालकांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने सखोल तपासणी करण्यात आली. जन्मतः हृदयरोग, गुंतागुंतीचे आजार तसेच श्रवण क्षमतेशी संबंधित अडचणी असलेल्या बालकांची तपासणी मुंबईतील ज्युपिटर डॉक्टरांनी केली.
या शिबिरादरम्यान सुमारे ४० हून अधिक बालकांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर लवकरच मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तपासणी झालेल्या इतर बालकांनाही पुढील उपचारासाठी सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले आहे.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भारतामध्ये अनेक गरीब व दुर्बल घटकांतील मुलांना वेळेवर निदान व उपचार न मिळाल्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा शिबिरांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक तपासणी आणि मोफत उपचार मिळाल्याने अनेक बालकांचे जीवन वाचू शकते. विशेषतः बालहृदयरोग योग्य वेळी निदान केल्यास बरा होऊ शकतो. तसेच, ५ वर्षांच्या आत श्रवण अडचणी असलेल्या बालकांवर उपचार केल्यास ते ऐकू आणि बोलू शकतात. मात्र, या उपचारांचा खर्च जास्त असल्यामुळे अनेक गरीब कुटुंबातील नागरिक हे उपचार करू शकत नाहीत. म्हणूनच अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे.
या शिबिरात वैद्यकीय तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि समर्पित आरोग्य कर्मचारी कार्यरत होते. तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक मुलावर अत्यंत संवेदनशीलतेने उपचार करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणताही गरीब बालक केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हीच आमची भावना आहे, पुढेही असे शिबीर आपण आयोजित करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
४० हून अधिक बालकांवर होणार शस्त्रक्रिया
सदर आरोग्य शिबिरात ४० हून अधिक बालकांना गंभीर स्वरूपाचे आजार असल्याचे निदान झाले असून, या सर्व बालकांवर पुढील तीन महिन्यांच्या आत मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयात निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ बालकांवर शस्त्रक्रिया केली जाणार असून, येत्या सोमवारी हे सर्व बालक मुंबईत रवाना होणार आहेत. त्यांना उपचारांसाठी आवश्यक असलेल्या प्रवास, राहणी, भोजन व इतर सर्व खर्च आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे.
१४ तासांच्या चिमुकलीवर तीन महिन्यांची होताच शस्त्रक्रिया
हृदयात छिद्र असलेल्या अवघ्या १४ तासांच्या एका चिमुकलीची तपासणी मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास एल. आणि डॉ. सोनिया कारापूरकर यांनी केली. ही चिमुकली तीन महिन्यांची झाल्यावर तिच्यावर मुंबईत निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तोपर्यंत तिच्यावर आवश्यक उपचार व नियमित वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे. ========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199