HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) : जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकाला भेट देत विविध विकासकामांचा सखोल आढावा घेतला.
रेल्वे प्रशासनासोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत स्थानकावरील सुरू असलेल्या कामांची प्रगती, प्रवासी सुविधांची सद्यस्थिती तसेच नियोजित प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा बारकाईने ऊहापोह करण्यात आला.
पाहणीदरम्यान काही कामांची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याचे स्पष्ट झाल्याने आ. मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कालबद्ध नियोजन करून कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. 
रेल्वे स्थानकांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रतीक्षालयांची सुविधा, तिकीट व्यवस्था, प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
या बैठकीत व्यापारी मंडळ, स्टेशन स्टॉल असोसिएशन, चाईल्ड लाईन हेल्प सेंटर तसेच स्थानिक नागरिकांनी विविध समस्या आणि मागण्या मांडल्या.
स्थानक परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा, प्रवाशांसाठी अधिक सोयी, तसेच काही गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल यांसंदर्भातील सूचना त्यांनी मांडल्या.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत आ. मुनगंटीवार यांनी संबंधित मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बल्लारशाह–कुर्ला रेल्वेगाडी तसेच काजीपेठ–पुणे मार्गावरील गाड्या दैनिक करण्याबाबतच्या मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे मांडण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर आ. मुनगंटीवार यांनी बल्लारपूर व चंद्रपूर रेल्वे स्थानकांचीही प्रत्यक्ष पाहणी केली.
स्थानक परिसरातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तांत्रिक व्यवस्था आणि सुरू असलेल्या विकासकामांचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला.
स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभाग यांच्यात समन्वय राखून प्रवाशांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांची गुणवत्ता आणि गती यावर कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “चंद्रपूर जिल्हा आणि विदर्भातील नागरिकांना दर्जेदार व आधुनिक रेल्वे सुविधा मिळणे ही आपली प्राथमिकता आहे.
रेल्वे विकास ही केवळ पायाभूत सुविधा नसून ती प्रदेशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची प्रमुख कडी आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू राहील.”
या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते, स्थानिक पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक पातळीवरील समस्यांवर थेट चर्चा झाल्याने आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मिळाल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
रेल्वे स्थानकांवरील सुरू असलेल्या विकासकामांना वेग मिळाल्यास चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी हरीश शर्मा, अजय दुबे, निलेश खरबडे, दामोदर मंत्री, अमित कासनगोट्टूवार, देवेंद्र वाटकर, डॉ मिलिंद दाभेरे, सुधाकर पारखी, सुनीता जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

























