Home
Home चंद्रपूर अम्मा कि पढाई गरजु विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा उपक्रम – आ. किशोर...

अम्मा कि पढाई गरजु विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा उपक्रम – आ. किशोर जोरगेवार. अम्मा की पढ़ाई शिक्षा केंद्रातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या २३ विद्यार्थ्यांचा सत्कार.

0
48

HELLO CHANDA NEWS

       चंद्रपूर,(का.प्र.) :अम्मा की पढ़ाई हा उपक्रम केवळ शिक्षण देण्यासाठी नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी दिशा देण्यासाठी आहे. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, काही वेळा उपक्रम थांबण्याचीही वेळ आली. मात्र विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे योगदान आणि आमचा दृढ निश्चय यामुळे हा उपक्रम पुन्हा उभा राहिला असून आज तो शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे. अम्मा कि पढाई गरजु विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाचे पंख देणारा उपक्रम असल्याचे  प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    अम्मा की पढ़ाई शिक्षा केंद्रातील १३ विद्यार्थ्यांची पोलीस विभागात नियुक्ती झाली आहे. तर  एका विद्यार्थ्याची पोलीस उपनिरीक्षक, तर दोन विद्यार्थ्यांची कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. तसेच इतर विद्यार्थी विविध शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.

  अशा एकूण २३ विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते या कार्यक्रमात ते बोलत होते.

       या प्रसंगी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, माजी कुलगुरू डॉ. विजय आंईचावर, गडचांदूरचे नगराध्यक्ष निलेश ताजने तसेच अम्मा की पढ़ाई केंद्रातून शिक्षण घेऊन नुकतेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झालेले पुण्यदीप शिलारकर, रघुवीर अहिर आदी मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आजचा हा क्षण केवळ आनंदाचा नाही, तर अत्यंत भावनिक आहे. येथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा संघर्ष, जिद्द आणि मेहनतीचा जिवंत पुरावा आहे.

ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही, अशा गरजू विद्यार्थ्यांचे स्वप्न कधीच अपूर्ण राहू नये, हा ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रम सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश होता.

      ते पुढे म्हणाले, दहावीत उत्तम गुण मिळवीत उत्तीर्ण होऊनही मला पुढील शिक्षण घेता आले नाही. इच्छा असूनही शिक्षण थांबवावे लागले.

       त्या वेदनेने मला आतून अस्वस्थ केले. आजही शिक्षण सुटल्याचे दुःख जाणवते. त्याच वेदनेतून हा संकल्प उभा राहिला.

                  या शिक्षण केंद्रात तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन, नियमित चाचण्या, मुलाखतीची तयारी तसेच शारीरिक चाचणीचे प्रशिक्षण अशा सर्व सुविधा निशुल्क उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

     आज या उपक्रमातून १३ विद्यार्थी पोलीस दलात दाखल झाले असून इतर अनेक विद्यार्थी विविध शासकीय सेवांमध्ये निवडले गेले आहेत.

      हे यश केवळ त्यांचे नसून त्यांच्या कुटुंबांचे, शिक्षकांचे आणि या उपक्रमावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

 तुमचे हे यश ही केवळ सुरुवात आहे. पुढील काळात तुम्ही समाजात जबाबदारीची भूमिका पार पाडणार आहात. मिळालेलं पद हे सेवेचं साधन आहे. तुम्ही जिथून आलात, त्या मातीतल्या संघर्षाची जाणीव कायम ठेवा आणि समाजासाठी प्रामाणिकपणे काम करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

   या उपक्रमातून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर अधिकारी घडवण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

          प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची संधी पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.

  आज या विद्यार्थ्यांचे यश पाहताना माझ्या अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची काही अंशी भरपाई झाल्यासारखे वाटते. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी समाधानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

    कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी विनय गौडा, वसुमना पंत आणि सुदर्शन मुमक्का यांनीही आपल्या भाषणात ‘अम्मा की पढ़ाई’ उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असल्याचे सांगितले.

    यावेळी एआयआयएमएस नागपूर मधून एमबीबीएस शिक्षणात सर्वोच्च प्रावीण्य मिळवत  गोल्ड मेडल पटकावून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणा-या वैदेही लोहिया हिचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा निरोप समारंभ.

यावेळी ‘अम्मा की पढ़ाई’ ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा निरोप समारंभ तसेच सत्कार करण्यात आला.

      त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जनतेसाठी सहज उपलब्ध असणारे जिल्हाधिकारी अशी त्यांची ओळख असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here