Home
Home चंद्रपूर मी कृतज्ञ आणि भावुक, चंद्रपूरचा कार्यकाळ कधीही विसरणार नाही — विनय गौडा...

मी कृतज्ञ आणि भावुक, चंद्रपूरचा कार्यकाळ कधीही विसरणार नाही — विनय गौडा जी सी. सोन्यासारख्या अधिकाऱ्याचा सत्कार करताना आमचे हातही सोन्याचे झाले”— आ. सुधीर मुनगंटीवार. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नांची शर्थ करेन : वसुमना पंत. जिल्हाधिकारी विनय गौडा आणि नव्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा भव्य जाहीर सत्कार संपन्न.

0
82

HELLO CHANDA NEWS

             चंद्रपूर,(का.प्र.) : चंद्रपूरकर जनतेच्या सत्काराने मी कृतज्ञ आणि भावुक झालो असून चंद्रपूरचा कार्यकाळ कधीही विसरणार नाही. या ऊर्जावान जिल्ह्यातुन मिळालेली ऊर्जा माझ्यासाठी विधायक कार्याची शिदोरी असल्याची भावना जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी व्यक्त केली.

          अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी सोन्यासारख्या अधिकाऱ्याचा सत्कार करताना आमचे हातही सोन्याचे झाले अशी भावना स्वागताध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून चंद्रपूरचे माजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा भावपूर्ण निरोप व कृतज्ञता सत्कार तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी श्रीमती वसुमनापंत यांचा स्वागतपर नागरी सत्कार सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

     प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनसामान्य यांच्यातील सुसंवाद, विश्वास आणि विकासाच्या एकात्म भावनेचे दर्शन घडवणारा हा सोहळा चंद्रपूरच्या इतिहासात संस्मरणीय ठरला.

         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत विनय गौडा यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,२०२२ मध्ये साताऱ्याच्या शिवछत्रपतींच्या भूमीतून वाघाच्या भूमीत आलेले विनय गौडा आता संभाजीनगरच्या छाव्याच्या भूमीत जात आहेत हा विलक्षण योग आहे.

                  त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या विकासाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

    ते पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आला, हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाचे फलित आहे.“त्यांच्या कार्यपद्धतीत ‘नाही’ हा शब्द कधी नव्हता. नियमांच्या चौकटीत बसणारे प्रत्येक काम त्यांनी प्राधान्याने पूर्ण केले आणि प्रशासनाला जनतेच्या अपेक्षांशी जोडले,” असे ते म्हणाले.
एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी ५० एकर जागा उपलब्ध करून देणे, मुल येथे शासकीय तंत्रनिकेतनासाठी एका तासात जागा निश्चित करणे, आचारसंहितेच्या काळात कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन यशस्वीपणे पार पाडणे, २० स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, जिल्हा न्यायालयासाठी ६५ कोटींच्या इमारतीचा प्रश्न सोडविणे, १० हजार घरांसाठी जागा उपलब्ध करून देणे  अशा विविध विकासकामांचा त्यांनी तपशीलवार उल्लेख केला.

       चंद्रपूर जिल्ह्याचा जीडीपी ५७ हजार कोटींवरून १ लाख ६ हजार कोटींवर नेण्यासाठी ‘अॅडव्हांटेज चंद्रपूर’ सारखा उपक्रम राबविण्यात आला. इतक्या संवेदनशीलतेने विकासाचा विचार करणारा अधिकारी चंद्रपूरला लाभला, हे आमचे भाग्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

   अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेल्या या सत्काराचा संदर्भ देत ते म्हणाले, “आज सोन्यासारख्या अधिकाऱ्याचा सत्कार करताना आमचे हातही सोन्याचे झाले आहेत.

  नवनियुक्त जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या स्वागत करताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “व्ही टू व्ही असा विकासाचा प्रवास पुढेही यशस्वी होईल. उत्तम काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहिले पाहिजे.”तसेच “चंद्रपूरचा ‘C’ हा ‘Champion’ चा ‘C’ झाला पाहिजे,” अशी प्रेरणादायी भावना त्यांनी व्यक्त केली.

                 नवनियुक्त जिल्हाधिकारी वसुमनापंत यांनी आपल्या मनोगतात अत्यंत भावूक होत सांगितले, “हा सत्कार स्वीकारताना मी अक्षरशः निशब्द झाले आहे. ‘हम्बल्ड अँड ओव्हरव्हेल्म्ड’ अशी माझी अवस्था आहे.”त्या पुढे म्हणाल्या, “नऊ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत असा निरोप आणि स्वागत समारंभ कधी अनुभवला नाही.

         विनय गौडा यांनी साडेतीन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.”त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून गौडा यांच्याशी असलेले नाते अधोरेखित करत सांगितले की,“त्यांनी निश्चित केलेले उच्च स्टँडर्ड पुढे नेण्यासाठी मी शर्थीचे प्रयत्न करेन. लोकप्रतिनिधींनी दाखविलेला विश्वास मी कधीही तडा जाऊ देणार नाही.”

      सत्काराला उत्तर देताना विनय गौडा अत्यंत भावूक व हळवे झाले. चंद्रपूर जिल्ह्याच्या सेवेची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

आजचा सत्कार म्हणजे गेल्या तीन वर्षांच्या कामाचा जणू फ्लॅशबॅक आहे,असे त्यांनी सांगितले.

              ते पुढे म्हणाले,आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्री म्हणून दिलेला सातत्यपूर्ण पाठिंबा आणि विकास प्रक्रियेला दिलेला वेग माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

  १४ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘ट्रान्सफॉर्मेटिव्ह’ असल्याचे सांगत त्यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदानही कृतज्ञतेने नमूद केले.चंद्रपूरची ओळख वेगळी आहे.

    वातावरण सकारात्मक असेल तर कामाचा उत्साह दुपटीने वाढतो. येथे उत्कृष्ट ‘पॉलिटिकल इकोसिस्टीम’ असल्यामुळे विकासाला गती मिळाली,” असे सांगत त्यांनी आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

             ५००१ किमी पाणंद रस्ते, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, फ्लाईंग क्लब, कॅन्सर हॉस्पिटल, सोलर नळपाणी योजना, ‘अॅडव्हांटेज चंद्रपूर’, मॉडेल स्कूल, स्मार्ट पीएचसी अशा विविध उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की,या सर्व उपक्रमांत योगदान देण्याचे भाग्य मला लाभले व सुधीर मुनगंटीवार यांच्या व्हिजनरी लीडरशीपची साथ देखील लाभली.

 
शेवटी ते भावूक होत म्हणाले,चंद्रपूरला येताना माझे कुटुंब अपूर्ण होते, पण येथून जाताना पूर्ण कुटुंब मागे सोडत आहे, ही भावना मनाला स्पर्शून जाते. चंद्रपूरचा कार्यकाळ मी आयुष्यभर जपून ठेवेन.” 

    यावेळी आमदार देवराव भोंगळे म्हणाले,विनय गौडा यांच्यासारखा संवेदनशील आणि विकासाभिमुख अधिकारी जिल्ह्याला लाभणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.

 त्यांनी प्रशासन आणि जनतेत विश्वासाचे नाते निर्माण केले.

     तर आमदार करण देवतळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले,गौडा यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यामुळे चंद्रपूरच्या विकासाला नवे परिमाण मिळाले. त्यांची कार्यशैली प्रेरणादायी आहे.

    या कार्यक्रमाला महापौर संगीता खांडेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी लतिमा तिवारी, मनपा आयुक्त आकनुरी नरेश आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

       यावेळी ताडोबाच्या जंगलातील वाघाची भव्य प्रतिकृती देऊन विनय गौडा यांचा सत्कार करण्यात आला, तर बांबूपासून तयार केलेला आकर्षक मोर वसुमना पंत यांना भेट देत त्यांचे स्वागत करण्यात आले.

ऐश्वर्या भालेराव यांनी मानपत्र वाचन केले, तर नासिर खान यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

            यावेळी माजी आमदार अतुल देशकर, हरीश शर्मा, डॉ मंगेश गुलवाडे, राजीव कक्कड,सौ मनस्वी गिऱ्हे, बंडू गौरकर, प्रकाश धारणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

 
                  शेतकरी संघटना, व्यापारी संघटना, विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्था, कन्यका नागरी सहकारी बँक आदींसह अनेक संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही अधिकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हा नागरी सत्कार सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न ठरता, चंद्रपूरच्या विकासासाठी एकत्रितपणे पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करणारा प्रेरणादायी क्षण ठरला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here