प्रियदर्शीनी सभागृहात 3 दिवसीय व्याख्यान
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे.परंतु दुर्दैवाने मागील 75 वर्षात जनतेपर्यंत सशस्त्र क्रांतिकारकांचा इतिहास आपण पोहोचवू शकलो नाही.नवीन पिढीला याची कल्पना नाही.म्हणून त्यांना,मित्र व शत्रू कोण..?हे कळत नाही.स्वातंत्र्य एक दोन लोकांनी नाही तर,स्वातंत्र्याच्या या गोवर्धनाला अनेकांच्या काठ्या लागल्या.असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ सच्चिदानंद शेवडे यांनी केले.ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या वतीने प्रियदर्शिनी सभागृहात ‘सावरकर एक झंझावात’ या विषयावर आयोजित 3 दिवसीय व्यख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना मंगळवार(8 ऑगस्ट)ला बोलत होते.
कॅबिनेट मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन आयोजित या व्याख्यानमालेचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले.
यावेळी थोर विचारवंत डॉ सच्चिदानंद शेवडे, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सचिव अनिल बोरगमवार,प्रकाश धारणे,भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,माजी नगरसेवक सुभाष कसंगोट्टूवार,अनिल फुलझेले,संदीप आवारी,रवींद्र गुरनुले,अरुण तिखे,साक्षी कार्लेकर,सतीश तायडे यांची उपस्थिती होती.
डॉ.शेवडे म्हणाले,ज्या क्रांतिवीरांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहुती दिली त्यांचा इतिहास आम्ही निरंतर समरण केला पाहिजे. चाफेकर व सावरकर या दोन घराण्यातील 3 सख्खे भावंड स्वातंत्र्य संग्रामात उतरली.हा देश स्वतंत्र व्हावा याची जाण वीर सावरकरांना बालपणापासून होती असे ते म्हणाले.डॉ.शेवडे यांनी वीर सावरकरांच्या ज्वाजल्य देशभक्तीचे अनेक प्रसंग विशद केले.तिरंगा राष्ट्रध्वज आपले मानबिंदू असून त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे,म्हणून हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा.आवाहन त्यांनी केले.
देशाच्या अखंडतेसाठी चिंतेची बाब
1920 पर्यंत आपण एक राष्ट्र होतो. पुढे मात्र देश झालो,याला तत्कालीन मवाळ नेतृत्व जबाबदार होते. स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंनी भाषावार प्रांतरचना केल्यामुळे आपल्यातील एकोपा कमी होऊ लागला. आपल्याच देशातील पण अन्य राज्यात राहणारे आपले बांधव ‘परप्रांतीय’ वाटू लागले. समरसता संपुष्टात आली. आपलेच नागरिक व बांधव असलेले लोक परप्रांतीय कसे? हा कळीचा प्रश्न त्यांनी मांडला.
पुढे ते म्हणाले की, एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस होणारा लोकसमूह म्हणजे राष्ट्र तर आखलेल्या सीमेमध्ये बद्ध झालेला जमिनीचा तुकडा म्हणजे देश होय! पूर्वीच्या काळी जाती होत्या पण द्वेष नव्हता. स्वातंत्र्यानंतर राजकीय वा अन्य फायद्यांसाठी जातीय द्वेष वाढताना दिसतो आहे. व्हाट्स अप व फेसबुकीय युनिव्हर्सिटीज मधून खोटा व द्वेषमूलक इतिहास पसरवला जातो आहे. देशाच्या अखंडतेसाठी ही चिंतेची बाब आहे.