HELLO CHANDA NEWS
मुंबई,(का. प्र.) :येथील पॅगोडा विपश्यना केंद्राच्या धर्तीवर चंद्रपूर शहरातील धम्मभूमी, आंबेडकर नगर, बाबूपेठ येथे ७ एकर जागेवर भव्य विपश्यना ध्यान केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.
या अनुषंगाने आज त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रकल्पाचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी तहसीलदार विजय पवार, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुले, मनपा शहर अभियंता रविंद्र हजारे, उपअभियंता भसारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राठोड, महावितरणचे कार्यकारी अभियंता दार्वेकर, मनपा अभियंता पवार, धम्मभूमी महाविहारचे संचालक महाथेरो डॉ. सुमनवन्नो, सायली येरणे, निलिमा वनकर आदींची उपस्थिती होती. 
स्थळ पाहणीदरम्यान आ. जोरगेवार यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली.
यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने सविस्तर व तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रस्ताव सादर करताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. प्रवेशमार्ग सुकर करणे, पाणी व वीजपुरवठ्याची योग्य व्यवस्था करणे, पर्यावरणीय संतुलन राखणे तसेच संपूर्ण प्रकल्पाचा आराखडा पॅगोडा धर्तीवर आकर्षक आणि दर्जेदार पद्धतीने तयार करणे, यावर विशेष भर देण्यात आला.
आ. जोरगेवार म्हणाले की, हे विपश्यना केंद्र केवळ धार्मिक स्थळ नसून मानसिक शांतता, ध्यानधारणा आणि अध्यात्मिक साधनेसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरेल.
या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही चालना मिळेल. तसेच, प्रस्ताव शासनाकडे पाठविताना सर्व आवश्यक कागदपत्रे, नकाशे आणि तांत्रिक बाबी पूर्ण करून सादर कराव्यात, जेणेकरून मंजुरी प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
























