भद्रावती शाखेतर्फे पोलिसांकडे तात्काळ कारवाईची व संरक्षणाची मागणी.
भद्रावती
हॅलो चांदा न्युज
भद्रावती.(का प्र ) :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष मा. सिद्धार्थ भोकरे यांना अलीकडेच एका अज्ञात इसमाकडून निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. दिनांक १५ मे २०२५ रोजी एका दैनिकात ‘सिंदूर ऑपरेशन’ संदर्भात त्यांनी व्यक्त केलेल्या मतानंतर ही धमकी आली असून, त्या पत्रात “माफी माग नाहीतर तुला उडवून देऊ” असा थेट इशारा देण्यात आला आहे.
ही घटना पत्रकारांच्या सुरक्षिततेला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का देणारी असून, याविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पत्रकार संघाच्या वतीने संबंधित अज्ञात इसमावर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी आणि मा. भोकरे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
भद्रावती पोलीस स्टेशन येथे याबाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तालुका शाखा भद्रावती चे अध्यक्ष शाम चटपल्लीवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस सुनील दैदावार, विनोद वांढरे, पवन शिवणकर, निशांत देवगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रत मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर , जिल्हाधिकारी, चंद्रपूर, तसेच पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. गोविंद वाकडे, उपाध्यक्ष मा. प्रा. महेश पानसे यांना सादर करण्यात आली आहे.
पत्रकार संघाने इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर आरोपीस अटक झाली नाही आणि मा. भोकरे यांना सुरक्षा न दिली गेली, तर राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील अशा
इशारा राज्य अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य उपाध्यक्ष प्रा. महेंश पानसे यांनी आधिच दिला आहे.
























