फ्लाईंग क्लबमुळे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला प्रगतीचा आढावा

0
20

=====================

चंद्रपूर, दि. 17 : चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन भवन येथे कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
==================
प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण करण्यासाठी मोरवा येथील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी 63 लक्ष तर संरक्षण भिंतीसाठी 11 कोटी 93 लक्ष रुपये तातडीने मंजूर करण्याच्या सूचना ना . मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील धावपट्टीचे कार्पेटिंग विमानाच्याच गतीने करावे, यात संबंधित यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे. निवड करताना पहिल्या टप्प्यातील 10 प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मागास प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा समावेश आवर्जून करावा. तसेच केंद्र शासनाच्या कोल इंडिया, ओ.एन.जी.सी., इंडियन ऑईल, जे.एन.पी.टी., हिंदुजा, अदाणी, टाटा, बिरला आदी उद्योग समूहांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) विमानांची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी तातडीने परीपूर्ण प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
======================
यावेळी सादरीकरण करताना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, दुस-या टप्प्यात हँगरकरिता 10 कोटी, फ्रंट ऑफिसकरिता 37 लक्ष तर ॲप्रोच रोडकरीता 2 कोटी 50 लक्ष रुपयांची आवश्यकता आहे. तसेच एक इंजिन असलेली सेस्ना कंपनीची दोन विमाने आणि दोन इंजिन असलेले एक विमान घेण्यात येणार आहे.
======================
नुकतेच नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – 172 आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. या विमानाने टेक ऑफ, लँडिंग व हवाई मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचे तसेच प्रशिक्षणासाठी इतर आवश्यक बाबींचे निरीक्षण केले. एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होत असलेल्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून चंद्रपूरातील मोरवा विमानतळाचा पर्याय शोधण्यात आला आहे.
====================
या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., कॅप्टन इझिलारसन व त्यांचे दोन सहकारी अभियंता सादत बेग आणि हरीश कश्यप आदी उपस्थित होते.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here