बॉटनिकल गार्डनचे काम ‘वॉर फुटींग’ वर पूर्ण करा आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना निधीसाठी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचेही निर्देश

0
83
  • मुंबई: आदिवासी आणि गोरगरीबांना जगण्याचे साधन ठरणाऱ्या आणि जैव विविधतेमध्ये रुची असलेल्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरु पाहणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बॉटनिकल गार्डनच्या पूर्णत्वासाठी अधिकाऱ्यांनी ‘वॉर फुटींग’ वर काम करण्याची आवश्यकता आहे; कामाचे नियोजन, निधीची आवश्यकता आणि आवश्यकता असेल तेथे तज्ञांचे मार्गदर्शन याकडे अधिक गांर्भीयाने लक्ष देवून याचे ‘लोकार्पण’ त्वरीत होईल यादृष्टीने काम करण्याच्या सूचना विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विधानभवन येथे यासंदर्भात वन विभागाचे प्रधान सचिव व सबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेवून चर्चा केली.
    चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्र हे निसर्ग, वन आणि जैव विविधतेने संपन्न आहे. समृध्द निसर्गाचे वैभव प्राप्त झालेल्या या परिसराच्या विकासाच्या दृष्टीने वन मंत्री असताना आ.सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक १६ जून,२०१५ ला १३१.४४ कोटी निधीसह हा प्रकल्प आणला. या प्रकल्पात कंर्झव्हेशन झोन, रिक्रिएशन झोन असून ज्यात खुले फुलपाखरु उद्यान, पामेटम, बोन्साई गार्डन, बोगन वेलिया गार्डन यासह जलमृद संधारणाची कामे, जलाशय, ट्री हाऊस आदींचा समावेश आहे. जगभरातील जैव विविधतेच्या अभ्यासकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रत्येक अधिवेशनामध्ये आ.सुधीर मुनगंटीवार यांनी पोटतिडकीने विषय मांडून निधी मंजूर करुन घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात या प्रकल्पाचा मोठा वाटा राहणार आहे. या सर्व बाबींचा उल्लेख बैठकीत करुन आ.मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना प्रकल्पाविषयीचे गांर्भीय पटवून दिले.
    बॉटनिकल गार्डनच्या उर्वरीत कामांकरिता, ज्यामध्ये ‘तारांगण’ (प्लानेटोरीअम) हा विषय महत्वाचा आहे तातडीने आराखडा तयार करुन निधीच्या उपलब्धतेसाठी प्रस्ताव पाठवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
    निर्सग पर्यटनाकरिता उपलब्ध असलेल्या निधी संदर्भात आ.मुनगंटीवार यांनी या बैठकीत विचारणा करुन उपलब्ध निधीपैकी काही रक्कम बॉटनिकल गार्डनसाठी देता येईल का याबाबतही तपासून कार्यवाही करण्याचे सांगितले. बॉटनिकल गार्डनमध्ये ‘सौर’ उर्जेची उपलब्धता याचा विचार या बैठकीत करण्यात आला.
    या बैठकीस प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर, प्र. ज. लांजकर, उप वनसंरक्षक श्रीमती श्वेता बांडूडू, कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार आदी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here