स्वातंत्र्य हे मिळाले नसून मिळवले- डॉ.शेवडे व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प -वंद्य वंदे मातरम

0
68
दरवर्षी 15 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमाच्या मध्ये येणारे वक्ते 15ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले असे सांगतात. मुळातच हे वाक्य चुकीचे आहे, कारण कोणती गोष्ट सहजपणे मिळते याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? स्वातंत्र्य म्हणजे दान किंवा भीक नव्हे, की ते सहजपणे कोणी देऊन जाईल किंवा ते सहज मिळेल. त्यामुळे यापुढे तरी किमान पुढच्या पिढीला 15 ऑगस्ट 1945 दिनी भारताने स्वातंत्र्य मिळवले असे सांगायला हवे.असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी केले.ते प्रिदर्शिनी नाट्य सभागृह येथे वीर सावरकर एक झंझावात या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ‘वंद्य वंदे मातरम’ गुंफतांना बुधवार 10 ऑगस्टला बोलत होते.यावेळी गोवा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम सैनिक डॉ शेषराव इंगोले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.डॉ इंगोले यांचा डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे सचिव अनिल बोरगमवार,कोषाध्यक्ष राजीव गोलिवार व प्रकाश धारणे यांनी बांबू पासून निर्मित राष्ट्रध्वज देऊन सत्कार केला.
डॉ शेवडे पुढे म्हणाले,’स्वातंत्र्य मिळवले’ या शब्दामध्ये पराक्रम, ओज, तेज, धैर्य, बलिदान या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात. ‘मिळाले’ या शब्दांनी नेमके काय कळते? असा प्रश्न डॉ. शेवडे यांनी उपस्थित केला. चंद्रपूर येथील व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प ‘वंद्य वंदेमातरम’ या शीर्षकाचे होते.
पुढे बोलताना त्यांनी वंदे मातरमचा रोचक इतिहास कथन केला 1875 मध्ये ते गीत बंकिमचंद्रांनी लिहिले आणि पुढे त्यांच्या ‘आनंद मठ’ या कादंबरीमध्ये ते येण्यासाठी 1880 हे वर्ष उजाडावे लागले. बंग दर्शन मध्ये आनंद मठ ही कादंबरी क्रमशः प्रकाशित होत होती. त्यामध्ये वंदे मातरम हे गीत घालण्यात आले. ही कादंबरी संतानांच्या उठावावर आधारित होती. त्यातील हे गीत कादंबरी प्रकाशित झाली, तरी सुद्धा गाजले नव्हते. पण बंकिमचंद्र आपल्या मुलीला एकदा म्हणाले होते की, भारतभरातले लोक या गीताने झपाटून जातील हे नक्की! तसेच झाले खरे, पण ते बघायला स्वतः बंकिम मात्र जिवंत नव्हते. 1899 मध्ये काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनामध्ये हे गीत पहिल्यांदा रवींद्रनाथ ठाकूर यांनी गायले. त्यानंतर प्रत्येक काँग्रेस अधिवेशनाचा प्रारंभ या गीतानेच होत असे. 1931 मध्ये या गीताला पहिला विरोध हा काँग्रेस् अधिवेशन अध्यक्ष मौ. मोहम्मद अली यांनी केला. पुढे मुस्लिम लीगच्या दबावामुळे या गीतातील केवळ पहिली दोन कडवी म्हटली जाऊ लागली आणि अखेर 1940 पासून तीही बंद झाली. बंगालची फाळणी 1905 मध्ये लॉर्ड कर्झनमुळे अस्तित्वात आली आणि उभा बंगाल त्या विरोधात पेटून उठला. केवळ बंगालच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र या फाळणीच्या विरोधात उभे ठाकले. कोलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये एक विशाल सभा 7ऑगस्ट 1905 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला जवळपास तीस हजार लोक जमले. एकाच वेळी तीन ठिकाणी ही सभा घ्यावी लागली. लोक खूप आधीपासून सभास्थानी येऊन बसले होते. अस्वस्थता व चीड खूप होती आणि तिला मोकळी वाट करून देण्याकरता एक मुलगा उभा राहिला. आकाशाकडे हात पसरून त्याने तारस्वरात ‘वंदे मातरम’ ही घोषणा दिली. एकाएकी हजारो लोकांच्या कंठातून त्या घोषणेची आवर्तने होऊ लागली आणि वंदे मातरम या शब्दांना मंत्ररूप लाभले. सर्वत्र वंदे मातरम् या मंत्राच्या शब्द लाटा उसळू लागल्या. पुढे देशाच्या विविध प्रांतातील क्रांतिकारकांनी सुद्धा वंदे मातरम् चा गजर केला. अनेक जणांनी आपले रक्त, घाम आणि अश्रू या मंत्रासाठी सांडवले. अखेर 1912मध्ये ब्रिटिशांना ही फाळणी मागे घ्यावी लागली. पण पुढे त्यांनी याहून भयानक फाळणी लादली. ज्यामध्ये बंगाल प्रांता बरोबरच अर्धा पंजाब आणि अर्धा सिंध हा ही तोडला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनी हा सर्व इतिहास सर्वांपर्यंत पोहोचायला हवा त्यासाठीच हा जागर आहे, असे डॉ. शेवडे म्हणाले.

आणि वंदे मातरम लोकांसमोर आले…..

आनंदमठ कादंबरीच्या वाढत्या खपामुळे ‘वन्देमातरम्’ हे गीत लोकांसमोर आले. गीताची लोकप्रियता कादंबरीमुळे अधिक वाढली. असे असले तरी ते प्रत्येकाच्या मुखात रूळू लागले नव्हते. 1883 मध्ये कादंबरीवर आधारित ‘आनंदमठ’ नावाचे नाटक आले. यावेळी ‘वन्देमातरम्’चे प्रथमच जाहीर गायन झाले. सभांमधले पहिले जाहीर गायन 1896 मध्ये झाले. राष्ट्रीय सभेच्या (काँग्रेसच्या) मंचावरून संपूर्ण वन्देमातरम् म्हणण्यात आले. 1901 पासून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाच्या प्रारंभी संपूर्ण वन्देमातरम् म्हणण्याचा प्रघात पडला ! 1896 मधील जाहीर गायन स्वतः रचलेल्या चालीत करणारा प्रतिभावान कवी होता – रवींद्रनाथ ठाकूर ! मात्र हे पाहण्याचे भाग्य बंकिमचंद्रांच्या भाळी नव्हते! ते दोन वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाले होते !
गीत हळूहळू लोकांच्या तोंडी रूळू लागले. बंकिमचंद्र आपल्या कन्येला म्हणाले होते, “एक दिवस पाहशील दहा-वीस वर्षांच्या आतच या गीतामुळे सारा बंगाल पेटून उठेल आणि सारे भारतवासी या शब्दांनी झपाटतील.
तिला कदाचित हे पटले नसेलही! पण नियतीला मात्र हे नक्की माहीत होते असे डॉ शेवडे म्हणाले.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here