महिला आत्‍मनिर्भर झाल्‍यास देशाचा विकास निश्‍चीत आहे – ना. सुधीर मुनगंटीवार

0
41

आत्‍मनिर्भर भारत कार्यक्रमात ना. मुनगंटीवार यांची उपस्थिती व मार्गदर्शन.

 आजही अनेक ठिकाणी महिला या छोटया छोटया गोष्‍टींसाठी घरातील पुरूषांवर अवलंबून असतात. जर सर्व महिला आत्‍मनिर्भर झाल्‍या तर त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीगत विकासाबरोबरच देशाचा विकासही निश्‍चीत आहे, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना.  सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भाजपा जिल्‍हा आत्‍मनिर्भर भारत आघाडीतर्फे आयोजित महिलांच्‍या सक्षमीकरणासाठी आयोजित चर्चा सत्रात बोलताना ना. मुनगंटीवार यांनी सांगीतले.

आपण जर व्‍यवस्‍थीत प्रशिक्षण घेतले तर उदयाच्‍या यशस्‍वी उद्योजिका होणार यात शंका नाही असे प्रतिपादन सुध्‍दा ना. मुनगंटीवार यांनी केले. आपला देश कुठल्‍याही गोष्‍टीत किंवा तंत्रज्ञानात कधिही मागे नव्‍हता, परंतु विदेशी लोकांनी आपले तंत्रज्ञान चोरून नेल्‍यामुळे आपल्‍याला पुढे जाण्‍यासाठी त्रास होतो, परंतु आपण सर्वांनी मिळून देशासाठी एकत्र विचार केला तर निश्‍चीत आपण व देश एकाच वेळेला पुढे जावू. जुन्‍या काळात प्रत्‍येक गावात १२ बालुतेदार ही संकल्‍पना होती. ज्‍यामुळे सगळयांना काम मिळायचे. परंतु इंग्रजांनी ही पध्‍दत मोडीत काढली. पुन्‍हा अशा प्रकारचे छोटे उद्योग हे गावागावात उभे झाले पाहीजे. ज्‍यामुळे प्रत्‍येक गावाचा विकास होण्‍यास मदत होईल. यासर्व कला पित्‍याकडून मुलाकडे यायचा व पुढे पिढीजात त्‍या पुढे जायच्‍या. तसेच शिक्षण आता महिलांनी सुध्‍दा घ्‍यावे असे प्रतिपादन ना. मुनगंटीवार यांनी केले.

दुसरी महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे एकाने एक व्‍यवसाय सुरू केला व तो यशस्‍वी झाला की लगेच अनेक जण तोच व्‍यवसाय सुरू करतात. त्‍यामुळे सगळयांचा व्‍यवसाय हा संकटात सापडतो. त्‍यामुळे कुठला व्‍यवसाय कोणत्‍या गावात करायचा याचे प्रशिक्षणही आवश्‍यक आहे. समतोल विकास हवा असेल तर सुक्ष्‍म, लघु, कुटीर, हस्‍तकाम या सर्वांचे योगदान देशासाठी आवश्‍यक आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्‍हण मला मान्‍य नाही. पाय मोठे असतील तर अंथरूण मोठे करावे लागेल. यावर माझा विश्‍वास नाही, असे प्रतिपादन ही याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी केले. जिल्‍हयामध्‍ये जे क्‍लस्‍टर मी केले ते याआधी कोणीच केले नव्‍हते. यापुढील काळात गणवेश, वेकोलिसाठी लागणा-या वस्‍तु इथे कश्‍या तयार होतील याकडे आपण लक्ष द्यावे, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले.

याप्रसंगी आत्‍मनिर्भर भारतच्‍या भाजपाच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा किरण बुटले यांनी प्रास्‍ताविक केले. याप्रसंगी मंचावर प्रसिध्‍द वास्‍तु शास्‍त्रज्ञ डॉ. दीपा नंदनवार, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उद्योजक शशिकांत मोकाशे, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते रामपाल सिंह, माजी उपमहापौर राहूल पावडे, कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे उपसभापती रंजीत डवरे, रूद्रनारायण तिवारी उपस्थित होते. कार्यक्रमाला सोनम मडावी, सोनिया चोपडे, नितीन कारिया, शुभम शेगमवार, शुभम सिंह, श्रीकांत देशमुख, हिना खान, गौरकार सर यांनी अथक परिश्रम घेतला. कार्यक्रमाचे संचालन शिल्‍पा कोंडावार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here