============≠=≠========
*समाज कसा असावा याची शिकवण ग्रामगीतेत*
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यस्मरणप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*==
≠==========================
*चंद्रपूर :* ‘देश कसा असावा याची विस्तृत व उत्तम माहिती भारतीय संविधानात आहे, तर समाज कसा असावा हे जाणुन घ्यायचे असेल तर राष्ट्रसंतांची ग्रामगीता वाचायलाच हवी. निस्वार्थ भावनेने राष्ट्रसंतांनी ग्रामगीता समाजाला अर्पण केली, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वंदनीय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यस्मरण प्रसंगी आयोजित डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा, डॉ. वासुदेव गाडेगोणे, वेकोलिचे महाव्यवस्थापक संजय वैरागडे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोडेकर, माजी उपमहापौर राहुल पावडे, अजय वैरागडे, माजी नगरसेवक रवींद्र गुरनुले, भाजपा युवा आघाडीचे अध्यक्ष विशाल निंबाळकर, आयोजक सुभाष कासनगोट्टुवार, मंजुषी कासनगोट्टूवार,माजी नगरसेवक अजय सरकार, पुरुषोत्तम सहारे, विजय चिताडे, विजय पोहणकर, लक्ष्मण सावरकर, उमेश आष्टनकर, रुद्रनारायण तिवारी, प्रज्ञाताई बोरगमवार, छबूताई वैरागडे, विनोद शेरकी, बबनराव अनमूलवार, पुरुषोत्तम राऊत,माया मांदाडे, धनराज कोवे उपस्थित होते.
ना.मुनगंटीवार यांनी सांगितले की, ‘वडिल डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार यांनी व्रतस्थ जीवन व्यतीत केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खंजिरी भजन स्पर्धेला त्यांचे नाव मिळणे हे सौभाग्यच आहे. एकविसाव्या शतकात सोशल माध्यमांचा सर्रास वापर होत आहे. अशात ग्रामगीतेतून प्रत्येकाने समाजावर होत असलेले पाश्चात्य विषारी आक्रमण रोखण्यासाठी पुढे यावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जातीपातीच्याही पलीकडचे होते. ‘बंधुभाव नित्य वसू दे..’ असे राष्ट्रसंतांचे विचार जगात सगळ्यात अमूल्य आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज आपण राष्ट्रध्वजाला सलाम करीत आहोत. राष्ट्रसंतांनी हा देश ‘तन..मन..धन से सदा सुखी हो भारत देश हमारा’ अशी प्रार्थना करीत सर्वांत आधी राष्ट्र असल्याचे दाखवून दिले.’
राष्ट्रसंतांचा विचार कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार नमूद करीत म्हणाले की, राष्ट्रसंतांच्या टोपीचा रंग भगवा आहे. त्यातील ‘भ’ हा भयमुक्तीचा आहे. ‘ग’ हा ग्रामगीतेचा आहे, ज्यातून माणूस घडविण्याची शिकवण दिली जाते. ‘वा’ वासनारहित जीवन जगण्यासाठी प्रेरित करणारा आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांचा हा भगवा प्रत्येकाने अंगीकारावा. जंगलातील वाघही एकदा शिकार केल्यानंतर काही दिवस कुणाच्या वाट्याला जात नाही. परंतु माणूस आपल्या समोरचे ताट कितीही भरलेले असले तरी दुसऱ्याच्या हिश्श्याचेही ओढण्याचे पाहतो. ही वासना, हा हव्यास जर कमी करायचा असेल तर तुकडोजी महाराजांच्या विचारांवर चालणे नितांत गरजेचे आहे.
नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ’ हे आपल्यामुळे झाले. तुकडोजी महाराजांसाठीची ही एकप्रकारे सेवाच होती, असे ना.मुनगंटीवार यांनी अभिमानाने सांगितले. यामागे कोणतेही राजकारण नव्हते. केवळ खरा सेवाभाव होता. विधानसभेच्या खुर्चीपेक्षा गुरुकुंज मोझरी येथील त्या गादीवर बसण्याचे सौभाग्य अमूल्य वाटले ज्यावर स्वत: राष्ट्रसंत बसत होते. आमदार, मंत्रीपदाच्या अशा सगळ्या खुर्च्या महाराजांच्या त्या स्थानावर ओवाळुन टाकाव्याशा आजही वाटते, ईतकी ऊर्जा गुरूकुंझ येथे आहे . आपल्याला मोझरी येथे आजीवन सदस्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सध्या आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत आता आपण राष्ट्रसंतांच्या त्या ऊर्जास्थळाशी जोडले गेलो आहोत, असे भावनिक उद्गार मुनगंटीवार यांनी काढताच सभास्थळी राष्ट्रसंतांच्या नावाचा जयजयकार व टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की चंद्रपूर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याचे अतूट नाते आहे. झाड, झडुले शस्त्र बनेंगे.. हे भजन वाजत होते त्यावेळी इंग्रजांच्या विरोधात चिमूरची क्रांती झाली. १९४२ च्या चिमूर क्रांतिमागे व हा भाग सर्वप्रथम स्वतंत्र होण्यामागे जर कुणाची प्रेरणा होती तर ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचीच’, असे ना.मुनगंटीवार यांनी सांगतात उपस्थितांचे ऊर अभिमानाने भरून आले. राष्ट्रसंतांची खंजिरी भजन स्पर्धा आंतरराष्ट्रीयस्तरावर झाली पाहिजे. घराघरात ग्रामगीता पोहोचली पाहिजे यासाठी १० रुपयांत त्याची प्रत उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. तुकडोजी महाराजांवर चित्रपट निघायला हवा अशी आपली इच्छा आहे. एक वर्षात असा चित्रपट तयार होऊन राष्ट्रसंतांचे विचार जनाजनाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन ना.मुनगंटीवार यांनी दिले.
तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत यासाठी म्हटले जाते कारण त्यांनी नेहमीच राष्ट्राला प्राधान्य तर दिलेच पण खऱ्या अर्थाने संतत्व जपत प्रत्येक माणूस घडला पाहिजे अशी शिकवण दिली. त्यांच्या विचारांची उंची ईतकी होती की त्या उंचीचा माणूसही ते घडवायचे अशी भावनिक शब्दसुमनांजली सुधीर मुनगंटीवार यांनी तुकडोजी महाराजांना वाहात सांगितले की, गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून गुरूदेव भक्त एकाछत्राखाली आहेत. आपत्कालीन प्रसंगी गुरूदेव भक्तांसह जेथे कुठे संकटरुपी अंधार कोळोख पसरवू पहात असेल तिथे तिथे राष्ट्रसंतांच्या विचाररुपी मशालीने प्रकाश करण्याचे कार्य करावे लागेल. आपल्याकडे म्हटले जाते की कण कण में है भगवान. अमेरिकेन यावर संशोधन झाले,त्या संशोधनातूनही सिद्ध झालेय की अणू-रेणू सोबत प्रत्येक वस्तूही ‘गॉड पार्टीकल’ आहेत. हे आज अमेरिकेत संशोधनातून सिद्ध झाले असले तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे पूर्वीच सांगितले होते. देव हा मनुष्यात आहे, हिच शिकवण ग्रामगीता देत असल्याने ती सर्वांत मोठी व अमूल्य ग्रंथसंपदा आहे. राष्ट्रसंतांच्या सेवेसाठी प्रत्येक कार्यात आपण तत्पर असल्याची ठाम ग्वाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
वैकुंठ टेकडीचे संचालक श्री. सुबोधदादा व डॉक्टर वासुदेव गाडेगोणे,विजय चिताडे यांनी मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रास्ताविक केले.
__________________________
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
_______________________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793