पुरग्रस्त्‍ भागातील नागरिकांना त्वरीत मदत पोचवा – आ. मुनगंटीवार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले निर्देश

0
46

चंद्रपूर जिल्हयातील पूरस्थिती व त्यानंतर उद्वभवणा-या  परिस्थितीवर विचार करण्यासाठी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक घेतली. या बैठकीत जिल्हयातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला.

ज्या गावांमध्ये पाणी गेले आहे, त्या गावांमध्ये चा-याची व्यवथा त्वरीत करण्याची सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिली. जीथे पिण्याच्या पाण्याची व भोजनाची व्यवस्था नाही ती सुध्दा त्वरीत करावी असे आदेश आ. मुनगंटीवार यांनी दिले. काही गावांमध्ये विज व्यवस्था कोलमडली असून तेथील विज व्यवस्था तातडीने सुरु करावी, तसेच पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेवून तातडीने पाणी सुरु करावे. काही गावांमध्ये पुलांचे नुकसान झाली असून त्यांची दुरुस्ती व आवश्यकता असेल तर नविन पुलांची दुरुस्ती करावी.

पूर ओसरल्यानंतर नागरिक गावात आल्यानंतर साथी रोगांची शक्यता असु शकते, अश्या वेळेला गावातील विहिरींमध्ये ब्लिचींग पावडर टाकुन पाणी स्वच्छ करावे तसेच मच्छर निर्मुलन व्यवस्था तसेच आरोग्यासाठी वेगवेगळया चमु तयार करुन त्या त्या गावांमध्ये पाठवाव्या व नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. पाटाळा गावात पुलाचे बांधकाम सुरु आहे. तेथे कंत्राटदाराने फ्लाय ऍशचा वापर केला आहे. त्यामुळे या पूरात ती सर्व राख गावातील शेतांमध्ये आली ज्यामुळे शेताचे अतोनात नुकसान झाले आहे. अश्या कंत्राटदारावर कारवाई करावी असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

शेतांमध्ये पाणी घुसल्याने अनेक शेतक-यांच्या  जमीनी खरवडल्या गेल्या आहेत व अनेकांची खते वाहुन गेली आहेत. अश्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काही मदत मिळेल का याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. कित्येक शेतक-यांचे पंप, तुषार सिंचन संच,ठिबक सिंचन संच, सौर उर्जेच्या पत्रे वाहुन गेले त्यांचेही सर्वेक्षण करुन त्यांना काय मदत देता येईल ते पाहावे. काही धानाचे प-हे सुध्दा वाहुन गेले आहेत. त्यांना सुध्दा शक्य ती मदत करावी.वेकोलीच्या ओव्‍र बर्डनमुळे अनेक गावांमध्ये ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या संदर्भात दुरगामी उपाययोजना करण्यासंदर्भात वेकोली बरोबर बैठक लावावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. ज्या लोकांनी पूरग्रस्त्‍ लोकांना मदत केली अश्यांचा सत्कार करावा, असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. काही गावांमध्ये या काळात ग्रामसचिव अनुपस्थित असल्याच्या तक्रारी आल्या त्याची चौकशी करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिेले. काही गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्या गावातील नागरिक करीत आहेत. त्याचा आढावा घेवून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी . धानोरा, वढा, बेलसनी, किन्ही, चिंचोली या गावांमध्ये पुलांचे बांधकाम करावे लागेल. त्या करीता सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगुन त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

या पूराने अनेक गावांमधील शाळा व अंगणवाडी यांची नुकसान झाले आहे त्याचा आढावा घेवून त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. पूरामुळे अनेक गावांमध्ये घरात पाण्यामुळे चिखल निमार्ण झाला आहे. त्या ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करुन दयावा व तो‍ निधी व्यवस्थीत खर्च झाला याकडे लक्ष दयावे असे निर्देश आ.मुनगंटीवार यांनी दिले.

या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणाऱ्या 5 टक्के निधीचा वापर नैसर्गीक आपात्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्याची परवानगी जिल्हाधिका-यांना देण्यात यावी याचा शासन निर्णय आ. मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना काढण्यास सांगितले आहे. पूर आलेल्या घरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 हजार रु. तातडीची मदत करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात मासेमारीचे काम गेल्या 2 वर्षापासून बंद होते आ. मुनगंटीवार यांनी हे काम त्वरीत सुरु करण्याचे निर्देश देवून 30 जुलैला बिजाई टाका व जानेवारी पर्यंत मासेमारी करु द्या असे निर्देश जिल्हाधि-यांना दिले.

या बैठकी प्रसंगी पोलिस अधिक्षक, अपर जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, भाजपा ग्रामिण जिल्हाध्यक्ष  देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष  डॉ. मंगेश गुलवाडे, हरीश शर्मा, संध्या गुरनुले, अल्का आत्राम, राहुल पावडे, नामदेव डाहूले, सुलभा पिपरे, विवेक बोडे, नंदू रणदिवे अनिल, डोंगरे, नरेंद्र जिवतोडे, विजय वानखेडे, राकेश गौरकार, सुभाष गौरकार, प्रवीण ठेंगणे, अमित गुंडावार, अजय गोगुलवार, काशी सिंग, शिवचंद दिवेदी, आकाश वानखेडे, अफझल भाई इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here